चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 15:01 IST2023-08-18T14:38:27+5:302023-08-18T15:01:22+5:30
१० ऑगस्टला चार देशांचा युद्धसराव सुरु होताच चीनने शेकडोंच्या संख्येने छोटे आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घिरट्या घालणारे उपग्रह ऑस्ट्रेलियन आकाशात तैनात केले आहेत.

चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराजवळीत समुद्रतटावर चार देशांच्या मालाबार युद्धसरावामुळे चीनच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे नौदल युद्धसराव करत असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी चीनने ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटवले आहेत.
चीन या उपग्रहांद्वारे नौदलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, मलबार सरावाच्या आधी झालेल्या तालिसमन सेबर नौदल सरावाच्या वेळी चीनने अशीच हेरगिरी केली होती. चीनच्या या कृतीबद्दल तज्ज्ञांनी जगाला इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र एबीसीनुसार जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाची कंपनी ईओएस स्पेस सिस्टमने चीनच्या ३ उपग्रहांविषयी माहिती दिली होती. चीनचा शियान 12-01 उपग्रह उत्तर ऑस्ट्रेलिया भागात, शिजियान 17 उपग्रह आणि पूर्व भागात शिजियान 23 उपग्रह दिसून आला होता. तालिसमन सेबर नौदलाच्या सरावावर या उपग्रहांद्वारे नजर ठेवली जात होती.
परंतू, १० ऑगस्टला चार देशांचा युद्धसराव सुरु होताच चीनने शेकडोंच्या संख्येने छोटे आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घिरट्या घालणारे उपग्रह ऑस्ट्रेलियन आकाशात तैनात केले आहेत. या सॅटेलाईटनी हजारो वेळा तिथून उड्डाण केले आहे. सिडनीच्या बंदरावर हा युद्धसराव सुरु आहे. प्रत्येक सॅटेलाईटने जवळपास १० वेळा फेऱ्या मारल्या आहेत. अशा ३०० सॅटेलाईटच्या ३००० फेऱ्या झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन कंपनीने दुर्बिणीच्या मदतीने हे चिनी उपग्रह शोधले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या लष्करी कारवाईची हेरगिरी करण्याची चीनकडे विलक्षण क्षमता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि त्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलिया आणि भारतासारखे देश आहेत.