१८ गुन्हे, ४ वर्ष तुरुंगवास अन् आता थेट कॅबिनेटमध्ये वर्णी; कोण आहेत बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री शमा इस्लाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:11 IST2026-02-18T13:08:56+5:302026-02-18T13:11:56+5:30
१८ गुन्हे दाखल असलेल्या आणि ४ वर्षे तुरुंगात घालवलेल्या शमा आता बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

१८ गुन्हे, ४ वर्ष तुरुंगवास अन् आता थेट कॅबिनेटमध्ये वर्णी; कोण आहेत बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री शमा इस्लाम?
शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेला सुरुंग लावून बांगलादेशमध्ये आता नव्या युगाची सुरुवात झाली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या ४९ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची सध्या जगभरात चर्चा आहे. मात्र, या सगळ्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे नवनियुक्त परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी. कधीकाळी १८ गुन्हे दाखल असलेल्या आणि ४ वर्षे तुरुंगात घालवलेल्या शमा आता बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तुरुंगवास ते मंत्रिपद: एक धगधगता प्रवास
शमा ओबैद यांची ओळख बीएनपी पक्षातील एक फायरब्रँड नेत्या म्हणून आहे. शेख हसीना यांच्या राजवटीत त्यांच्यावर तब्बल १८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजकीय सूडबुद्धीतून त्यांना ४ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात डांबण्यात आले होते. विशेष म्हणजे, आज त्यांच्यावरील १७ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत किंवा फेटाळले गेले आहेत, तर केवळ एक हत्येचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या सर्व संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या शमा आज बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या आहेत.
वडिलांचा वारसा आणि अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग
शमा या बीएनपीचे दिग्गज नेते आणि माजी सरचिटणीस के.एम. ओबैदुर रहमान यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००८ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या प्रतिकूल काळात त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही मिळवले होते. मात्र, देशातील लोकशाहीसाठी त्या पुन्हा मायदेशी परतल्या आणि पक्षासाठी मैदानात उतरल्या.
रियल इस्टेट ते परराष्ट्र मंत्रालय
राजकारणात येण्यापूर्वी शमा ओबैद या रिअल इस्टेट व्यवसायात सक्रिय होत्या. एकेकाळी बांगलादेशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांच्या कुटुंबाची गणना होत असे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, आज त्यांची एकूण संपत्ती ४६ लाख टका इतकी आहे. हसीना सरकारच्या काळात जेव्हा मीडियावर निर्बंध आले, तेव्हा शमा यांनी स्वतःच बीएनपीच्या बड्या नेत्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे त्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या.
भारतासाठी शमा ओबैद महत्त्वाच्या का?
बांगलादेशाचे भौगोलिक स्थान भारत, चीन, म्यानमार आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असल्याने त्यांचे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत संवेदनशील मानले जाते. पंतप्रधान तारिक रहमान यांनी सर्व शेजारील देशांशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून शमा ओबैद या भारतासोबतच्या संबंधांना कशी दिशा देतात, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.
बीएनपीच्या या धमाकेदार विजयानंतर आणि तारिक रहमान यांच्या शपथविधीला भारताच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहिल्याने, दोन्ही देशांमधील संबंधांचे एक नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.