NEET क्वालिफाय, पण होऊ शकली नाही डॉक्टर; मॉडेलिंगमध्ये करियर, आता IAS ऑफिसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:10 IST2024-12-05T15:10:06+5:302024-12-05T15:10:39+5:30
IAS Taskeen Khan : तस्कीन खान यांनी अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा कष्ट करायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या प्रयत्नांचं फळ मिळालं. आयएएस होऊन त्यांनी आता सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

NEET क्वालिफाय, पण होऊ शकली नाही डॉक्टर; मॉडेलिंगमध्ये करियर, आता IAS ऑफिसर
मेहनत आणि जिद्दीने अनेकजण घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. तस्कीन खान यांनी अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा कष्ट करायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या प्रयत्नांचं फळ मिळालं. आयएएस होऊन त्यांनी आता सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तस्कीन यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं, त्यासाठी NEET परीक्षाही दिली होती आणि त्या क्वालिफाय देखील झाल्या होत्या.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई वडील आपल्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी पैसे उभे करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्ण राहिलं. यानंतर डेहराडूनमध्ये राहणाऱ्या तस्किन यांनी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. मात्र, नंतर मॉडेलिंगचं करिअर सोडून आयएएस होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि मेहनत करायला सुरुवात केली. तस्कीन अनेकवेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाल्या आहेत.
तस्कीन खान तीनदा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसल्या होत्या. पण प्रत्येक वेळी त्या नापास झाल्या. अखेर २०२२ मध्ये कठीण परिस्थितीशी लढा देत यश मिळवलं. ७३६ वा रँक मिळवून तस्किन खान यांनी सिद्ध केलं की, जिद्द असेल तर काहीही अवघड नाही. त्या अभ्यासात फारशा हुशार नसल्या तरी खेळात नेहमीच पुढे असायच्या. अशाप्रकारे शैक्षणिकदृष्ट्या सर्वोत्तम विद्यार्थी नसतानाही स्पोर्ट्समन स्पिरिट असलेल्या तस्कीन यांनी अनेकवेळा अपयशी होऊनही हार मानली नाही आणि आयएएस होण्याचा प्रवास पूर्ण केला.
तस्कीन या बास्केटबॉल चॅम्पियन आणि राष्ट्रीय स्तरावरील डिबेटर देखील आहे. त्यांच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे २०१६-१७ मध्ये मिस उत्तराखंड आणि मिस डेहराडूनचा खिताबही जिंकला आहे. मिस इंडिया ब्युटी पेजंटमध्येही भाग घ्यायचा होता, पण वडिलांच्या आजारपणामुळे आणि निवृत्तीमुळे माघार घ्यावी लागली. यूपीएससीच्या तयारीसाठी त्या मुंबईला आल्या. त्यानंतर २०२० मध्ये दिल्लीला गेल्या.