शेतकऱ्याचा मुलगा बनला ED अधिकारी, गावात पहिलीच सरकारी नोकरी; जाणून घ्या यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:13 IST2025-04-14T14:12:33+5:302025-04-14T14:13:13+5:30
आज गावातील युवकांसाठी आयुष रोल मॉडेल बनला आहे.

शेतकऱ्याचा मुलगा बनला ED अधिकारी, गावात पहिलीच सरकारी नोकरी; जाणून घ्या यशोगाथा
फर्रुखाबाद - जेव्हा संघर्षमय जीवन असेल पण स्वप्न मोठी आहेत तेव्हा मेहनत हा त्यावरचा एकमेव पूल आहे जो तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी मदत करतो. असेच काही फर्रुखाबाद जिल्ह्यातील खेरे नगला गावातील आयुष राजपूतसोबत घडले. या तरुणानं मिळवलेले यश हे प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष त्याच्या गावातील पहिलाच सरकारी नोकरी मिळवणारा तरुण बनलाय. घरची परिस्थिती बिकट, आर्थिक ताकद नाही यात आयुषचं बालपण गेले.
शेतात वडिलांच्या कामात हातभार लावत असताना आयुषने त्याच्यासाठी मोठं स्वप्न पाहिले. दिवसभर शेतात राबायचे आणि उर्वरित वेळेत अभ्यास करायचा हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. आयुष्याच्या कठीण प्रसंगीही त्याने कधी हार मानली नाही. SSC, CGL परीक्षेसाठी त्याने स्वत:ला झोकून दिले होते. आत्मचिंतन करून स्वत:मधील उणिवा भरून काढण्याचं काम तो करत होता. वेळेचे नियोजन, अभ्यासाला प्राधान्य देत होता. अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळालं आणि त्याची ईडीमध्ये सहाय्यक प्रवर्तन अधिकारी यापदावर निवड झाली.
गावात आनंदाचं वातावरण
आयुष राजपूतच्या गावात पहिल्यांदाच एका तरुणाची सरकारी नोकरीसाठी निवड झाली. ईडी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा आयुषचं यश पाहून गावात आनंदाची लाट पसरली. ठिकठिकाणी मिठाई वाटण्यात आली. लोकांनी आयुषच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. आज गावातील युवकांसाठी आयुष रोल मॉडेल बनला आहे.
आयुषनं त्याचे शिक्षण एसडी इंटर कॉलेज पाहला येथून सुरू केले. त्यानंतर स्वराजवीर इंटर कॉलेजमध्ये १२ वी पास केली. त्यानंतर २०२२ मध्ये रामकृष्ण महाविद्यालयातून बीएससीची पदवी घेतली. शिक्षणासाठी तो दररोज १५ किमी सायकलवरुन प्रवास करायचा. आयुष राजपूतला मिळालेले यश पाहून गावातील वृद्ध सांगतात, आता खेरे नगलात सरकारी नोकरीमुळे पहिले आशेचे किरण दिसत आहे. आयुषला पाहून इतर युवकही त्याचे अवलंब करतील. जर स्वप्न मोठे असेल तर मेहनतीने ते पूर्ण करण्यासाठी ताकद आपल्यात असते हे आयुषकडे पाहून दिसून येते.