लॉकडाऊनदरम्यान प्रेरणादायी पुस्तकांचा होता आधार- पीआर श्रीजेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 23:42 IST2020-06-23T23:41:58+5:302020-06-23T23:42:04+5:30
स्वत:ला प्रेरित करण्यासाठी या कालावधीत ‘प्रेरणादायी पुस्तके वाचली.’

लॉकडाऊनदरम्यान प्रेरणादायी पुस्तकांचा होता आधार- पीआर श्रीजेश
नवी दिल्ली : स्वगृही परतल्यानंतरही भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश आताच बाहेर जाऊ शकत नाही; पण त्याची काही तक्रार नाही, कारण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत नाही. दोनवेळचा आॅलिम्पियन श्रीजेश म्हणाला, कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाऊनदरम्यान दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) बेंगळुरूतील केंद्रात घालविल्यामुळे माझ्यासह अन्य अनेक खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य ढासळत होते. त्यामुळे स्वत:ला प्रेरित करण्यासाठी या कालावधीत ‘प्रेरणादायी पुस्तके वाचली.’
श्रीजेश कोच्ची येथील आपल्या निवासस्थानावरून बोलताना म्हणाला, ‘हा खडतर कालावधी होता, कारण आमची जीवनशैली पूर्णपणे बदलली होती. आपल्या विचारांचा समतोल राखणे ही सर्वात महत्त्वाची बाब होती. माझे वडील हार्ट पेशंट आहेत आणि मला दोन अपत्य आहेत (सहा वर्षांची मुलगी व तीन वर्षांचा मुलगा). त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक चिंतित होतो, कारण दोन्ही अधिक जोखीम असलेल्या वयोगटातील आहेत.
३२ वर्षीय श्रीजेशने कबूल केले की, लॉकडाऊनदरम्यान नकारात्मक विचार दूर ठेवणे कठीण होते. पण अमेरिकन ट्रायथ्लॉनपटू जोआना जीगरचे ‘द चॅम्पियन मार्इंडसेट-अँड अॅथ्लिट््स गाईड टू मेंटल टफनेस’ हे पुस्तक वाचून मानसिक कणखरता राखता आली.
श्रीजेश पुढे म्हणाला, ‘एका बाजूला मला घराची आठवण येत होती तर दुसऱ्या बाजूला तेथे जाऊन कुटुंबीयांना अडचणीत आणू इच्छित नव्हतो. कारण प्रवासा दरम्यान व्हायरसची लागण होण्याचा धोका होता. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी मी पुस्तकांचा आधार घेतला. लॉकडाऊनदरम्यान मी अनेक पुस्तके वाचली. त्यात फिक्शन, नॉन फिक्शनपासून प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश होता. त्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्यास मदत झाली. चॅम्पियन मार्इंडसेट असे पुस्तक आहे की मी ते दोनदा वाचले.’
भारताचे पुरुष व महिला हॉकी संघ २५ मार्चपासून भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) बेंगळुरू येथील दक्षिण केंद्रात होते. त्यावेळी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती.गेल्या शुक्रवारी हॉकीपटूंना एक महिन्याचा ब्रेक मिळाला असून, त्यांना केंद्रातून जाण्याची परवानगी मिळाली.श्रीजेश १४ दिवसांसाठी आता आपल्या घरी विलगीकरणात आहे. त्यानंतर त्याला आपल्या अपत्यांसोबत खेळता येईल व घराबाहेर पडता येईल. टोकियोमध्ये आपल्या कारकिर्दीतील तिसरे आॅलिम्पिक खेळणार असलेला श्रीजेश कारकिर्दीचा शेवट आॅलिम्पिक पदकासह करण्यास उत्सुक आहे.(वृत्तसंस्था)
>‘टोकियो माझे कदाचित अखेरचे आॅलिम्पिक असू शकते, पण मी नेहमी छोट्या लक्ष्याला प्राथमिकता देतो. आॅलिम्पिक पदक निश्चितच माझे लक्ष्य आहे. एक आॅलिम्पिक खेळून पदक जिंकणे तीन आॅलिम्पिक खेळ व रिकाम्या हाताने परतण्यापेक्षा चांगले आहे.’
-पीआर श्रीजेश