रेल्वे ट्रॅकवर आढळला महिला हॉकीपटूचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 23:59 IST2017-08-04T23:38:27+5:302017-08-04T23:59:53+5:30
भारतीय महिला हॉकी संघातील 20 वर्षीय ज्योती गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या ज्योती गुप्ताचा मृतदेह हरियाणामधील रेवारी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उढाली.

रेल्वे ट्रॅकवर आढळला महिला हॉकीपटूचा मृतदेह
गुरुग्राम, दि. 04 : भारतीय महिला हॉकी संघातील 20 वर्षीय ज्योती गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या ज्योती गुप्ताचा मृतदेह हरियाणामधील रेवारी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उढाली. चंदिगड - जयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसच्या चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे ज्योती गुप्ताने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्योती गुप्ताने भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं. तिचा खेळ पाहता भविष्यात एक मोठी खेळाडू म्हणून ती नावारुपाला येईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.
अचानक ट्रेनसमोर उडी मारली असल्याने ज्योती गुप्ता ट्रेनखाली आली असल्याचं रेल्वे चालकाने सांगितलं आहे. रेवारी स्थानकाजवळ रात्री 8:30 वाजता झज्जर रोड पुलावरुन जात असताना अचानक ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आली. यानंतर चालकाने रेल्वे पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेतला असताना ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला. ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इतक्या जवळ होती की तोपर्यंत ट्रेन थांबणं शक्य नव्हतं, अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी रणवीर सिंग यांनी दिली आहे.
ज्योतीने सर्वात शेवटचा फोन कॉल आपल्या सोनपतमधील घरी गेला होता. रात्री 7 वाजता फोन करुन बस खराब झाली असल्याने उशीर होईल असं तिने घरी सांगितले होते. इतका उशीर होऊनही ज्योती घरी आली नाही म्हणून रात्री 10.30 वाजता तिच्या आईने फोन केला असता रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत करत मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.