भारतात सुरु असलेल्या आशियाई हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने विजय प्राप्त करत वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केले आहे. दक्षिण कोरियासोबतच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ४-१ ने विजय प्राप्त केला आहे. अशाप्रकारे भारतीय संघ चौथ्यांदा चॅम्पिअन बनला आहे.
बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हॉकी स्पर्धा खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करून कोरियावर दबाव आणला. २९ व्या सेकंदाला हा गोल झाला, यानंतर कोरियाचा संघ सावध झाला आणि डिफेन्स मोडवर गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला पुढचे गोल करण्याची संधी मिळाली नाही.
परंतू दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाकडून दिलप्रित सिंगने २८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पहिल्या हाफमध्ये भारताने कोरियावर २-० अशी आघाडी मिळविली होती. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु होताच दिलप्रितने तिसरा गोल डागला आणि ३-० अशी आघाडी घेतली. तर चौथा गोल अमित रोहिदास याने नोंदविला. याच क्वार्टरमध्ये कोरियाने देखील एक गोल करण्यात यश मिळविले, त्यांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला परंतू भारताने तो हाणून पाडला.
२००३, २००७, २०१७ नंतर भारताने २०२५ मध्ये चौथ्यांदा आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. १९८२, १९८५, १९८९, १९९४ आणि २०१३ मध्ये पाच वेळा संघ उपविजेता राहिला आहे.