बासंबा शिवारात युवकाचा दगडाने ठेचून खून, एकास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:42 IST2025-03-22T16:42:19+5:302025-03-22T16:42:36+5:30

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला. 

Youth stoned to death in Basamba Shivara | बासंबा शिवारात युवकाचा दगडाने ठेचून खून, एकास घेतले ताब्यात

बासंबा शिवारात युवकाचा दगडाने ठेचून खून, एकास घेतले ताब्यात

बासंबा (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात दगडाने ठेचून एका युवकाचा खून झाल्याची घटना २२ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. बासंबा पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

फेरोजखान फरीदखान पठाण (रा. येळी ता. हिंगोली) असे खून झालेल्या मयत युवकाचे नाव आहे. बासंबा शिवारात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास आडे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, पोलिस अंमलदार कैलास गुंजकर, गजानन कऱ्हाळे, प्रविण राठोड, शेख उमर, चंद्रशेखर काशिदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी रस्त्याच्या शेजारी युवकाचा मृतदेह आढळून आला. तसेच बाजूला दगड, लाकडी दांडा पडलेला दिसून आला. त्यामुळे युवकाचा खूनच झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मयत युवकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता येळी येथील फेरोज खान फरीद खान पठाण यांचा मृतदेह असल्याचे चौकशीत आढळून आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला. 

खून प्रकरणात एकास घेतले ताब्यात
फेरोज खान फरीद खान पठाण यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शुक्रवारी मयत हा मित्रांसोबत गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. अन्य एकाच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. अधिक तपासानंतरच खूनातील मारेकरी कोण व खूनाचे कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: Youth stoned to death in Basamba Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.