महिला सरपंचावर तलवारीने हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 15:53 IST2019-04-23T15:51:48+5:302019-04-23T15:53:10+5:30
महिला सरपंचावरील झालेल्या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

महिला सरपंचावर तलवारीने हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल
हिंगोली : शहरालगतच्या कारवाडी येथील सरपंच पुष्पा बोथीकर यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रविवारी सकाळी २.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी रात्री उशिराने अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सरपंचावरील झालेल्या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पुष्पा बोथीकर यांचा जबाब घेतल्यावरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी पोलिसांची भूमिका होती. त्यात एक दिवस गेला. तर रविवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास हल्ल्यानंतर बोथीकर या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. बोथीकर यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्र मारल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. याप्रकरणी उशिराने अखेर २२ एप्रिल रोजी रात्री पुष्पा बोथीकर यांचा पोलिसांनी घेतलेल्या जवाबावरून अज्ञात आरोपीविरूद्ध हिंगोली ग्रामीण ठाण्यात कलम ३२६, ४४८ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोउपनि के. डी. पोटे हे करीत आहेत. एमएलसी जवाब प्राप्त होण्यास उशिर झाल्याने याप्रकरणी गुन्ह्याची उशिराने नोंद करण्यात आली.