शाळेत आलेले साहित्य पाठविले कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:30 AM2021-01-23T04:30:15+5:302021-01-23T04:30:15+5:30

हिंगोली : जि.प.च्या शाळांना मिळणाऱ्या सादिलवार खर्चातून विशिष्ट साहित्य घेण्याचा आग्रह धरला जात असून, अनेक शाळांवर आलेले हे थेट ...

Who sent the school supplies? | शाळेत आलेले साहित्य पाठविले कुणी?

शाळेत आलेले साहित्य पाठविले कुणी?

Next

हिंगोली : जि.प.च्या शाळांना मिळणाऱ्या सादिलवार खर्चातून विशिष्ट साहित्य घेण्याचा आग्रह धरला जात असून, अनेक शाळांवर आलेले हे थेट साहित्य चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाधिकारी मात्र आम्ही हे साहित्य पाठविले नसल्याचे सांगत असून, अनेक मुख्याध्यापक याबाबत तोंडी तक्रारी करू लागले आहेत.

सादिलवार खर्चासाठी १५ ते २५ हजारांपर्यंतची रक्कम शाळांना मिळते. यातून त्यांना शालेय कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करावे लागते. त्यावरून शाळांमध्येच अनेकदा मोठ्या प्रमाणात वाद होतात. कधी शालेय शिक्षण समिती हिशेब विचारते, तर कधी सहकारी शिक्षकच यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो. हा खर्च होतो किंवा होत नाही, यावरून आधीच एवढ्या संकटांचा सामना करावा लागत असताना, आता नवे संकट आले. शिक्षण विभागाने साहित्य पाठविले, असे सांगून जबरदस्तीने ते शाळेत उतरविले जात आहे. सॅनिटायझर, स्क्रीनिंग मशीन, बकेट आदी प्रकारचे हे साहित्य आहे. बाजारभावापेक्षा त्याच्या किमतीही जास्त आहेत. असे असताना ते घेण्यासाठी मुख्याध्यापकांवर दबावही आणला जात आहे. काही शाळांमध्ये तरीही हे साहित्य नाकारण्याचे धाडस दाखविण्यात आले आहे. आमचा खर्च आधीच झाला असून, याची रक्कम द्यायची कुठून? असा सवाल करण्यात आला आहे.

यामध्ये काही ठिकाणी उठाठेवी करणाऱ्या शिक्षकांना मात्र शिक्षण विभागाचा वचपा काढण्याची संधी मिळाल्याचेच चित्र दिसून येत आहे. ही मंडळी माध्यमांशी संपर्क साधून यावर आगपाखड करताना दिसत आहे. दुसरीकडे मुख्याध्यापक मात्र साहित्य लपवत फिरत आहेत. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, यामागे काही घोटाळा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत विचारले असता, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शिक्षण विभागाकडून असे कोणतेच साहित्य पाठविण्यात आले नाही. मुख्याध्यापकांवर दबाव आणण्याचा किंवा तसे काही पत्र देण्याचा विषयच नाही. आमच्याकडे अशी कुणी लेखी तक्रार दिली नाही. सादिलवार रक्कम शाळांनी त्यांना लागणाऱ्या साहित्यावर खर्च करायची असते. शाळांकडून दरवर्षी तो खर्च केला जातो.

Web Title: Who sent the school supplies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.