संघर्ष कायम! दिव्यांग मुलीने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हा आई मात्र शेतात राबत होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:52 IST2025-12-10T16:51:17+5:302025-12-10T16:52:56+5:30
गंगासह आठ बहिणी असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, बहिणींसह आई-वडील शेतमजुरीत मदत करतात.

संघर्ष कायम! दिव्यांग मुलीने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हा आई मात्र शेतात राबत होती
हदगाव (जि. नांदेड) : प्रतिकूल परिस्थिती, घरातील अडचणी आणि शारीरिक अपंगत्व या सर्वांवर मात करून गंगा कदम हिने क्रिकेटसारख्या खेळात चमकदार कामगिरी करत भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून वर्ल्डकप जिंकण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. तिच्या या कामगिरीचा देशभरात उत्सव साजरा होत असताना गंगाची आई मात्र नेहमीप्रमाणे शेतात राबत होती. याची आठवण गंगाने गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सांगताच उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे डोळे पाणावले. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी फुटाणा या गावी झाला.
गंगासह आठ बहिणी असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, बहिणींसह आई-वडील शेतमजुरीत मदत करतात. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या गंगाने शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. माध्यमिक शाळेतून महाविद्यालयापर्यंत तिने उत्तम कामगिरी करत प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतर ती विभागीय, राज्य आणि मग राष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात पोहोचली. घरची परिस्थिती कठीण असतानाही गंगाने क्रीडा क्षेत्रातील आपला प्रवास खंडित होऊ दिला नाही. स्वतःच्या मेहनतीवर ती देशाच्या संघातील महत्त्वाच्या पदावर पोहोचली. मागील महिन्यात झालेल्या पहिल्या दिव्यांग महिलांचा वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व केले. श्रीलंका देशात कोलंबिया येथे नेपाळसोबत अंतिम सामना झाला. यावेळी नेपाळ संघाचा सात विकेटने पराभव करत विजेतेपद पटकावले.
शेतात आहे, घरी जाऊन टीव्ही पाहते
वर्ल्डकपचा आनंद सांगताना गंगाने सांगितले की, आईला मी फोन करून ही गोड बातमी दिली तेव्हा ती शेतात कामात व्यग्र होती. तिने फोन बंद करून ‘घरी जाऊन टीव्हीवर बघते’ असे म्हणत पुन्हा कामाला लागली. हे सांगताना समारंभात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. कार्यक्रमाला पालकमंत्री माणिकराव झिरवाळ, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश आष्टीकर यांची उपस्थिती होती. यावेळी दिल्लीमध्ये तीन खोलींचे घर स्वखर्चाने देण्याचे आश्वासन खासदार आष्टीकर यांनी दिले.
आम्हाला तिचा अभिमान
गंगाच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया देत सांगितले, ‘आमच्या मुलीने जगाला भुरळ घातली. आमचे नाव मोठे केले. तिचा आम्हाला अभिमान आहे.’