सेनगाव पंचायत समितीत मनरेगा विहिरींसाठी 'ओले' झाले हात; इंजिनिअरचा पैसे घेतानाचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:40 IST2026-02-21T10:39:35+5:302026-02-21T10:40:15+5:30
हा पैसा नेमका कशासाठी घेतला जात होता? कोणाच्या कामाच्या मंजुरीसाठी ही 'दलाली' घेतली गेली? आणि या साखळीत आणखी किती अधिकारी सामील आहेत? हे आता चौकशीचा विषय बनले आहे

सेनगाव पंचायत समितीत मनरेगा विहिरींसाठी 'ओले' झाले हात; इंजिनिअरचा पैसे घेतानाचा Video व्हायरल
सेनगाव - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समिती कार्यालय सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतल्याचे पाहायला मिळत आहे. गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या मनरेगा (MGNREGA) शासकीय विहीर योजनेत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण सुरू असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणातील एका इंजिनिअरचा चक्क पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव पंचायत समितीच्या आवारातच हा सर्व प्रकार घडला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित इंजिनिअर एका व्यक्तीकडून पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य भरदिवसा आणि पंचायत समिती कार्यालयाच्या समोरच घडले आहे, ज्यामुळे 'या भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही?' असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी आणि त्याचे मोजमाप करून बिल काढण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत होत्या.
हा पैसा नेमका कशासाठी घेतला जात होता? कोणाच्या कामाच्या मंजुरीसाठी ही 'दलाली' घेतली गेली? आणि या साखळीत आणखी किती अधिकारी सामील आहेत? हे आता चौकशीचा विषय बनले आहे. "पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असून, काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय सामान्य नागरिकांची साधी कामेही होत नाहीत," असा थेट आरोप आता नागरिकांमधून होत आहे. गरीब शेतकरी आधीच संकटात असताना, हक्काच्या शासकीय योजनेसाठी त्यांना खिशातून पैसे मोजावे लागत असतील, तर ही बाब अत्यंत लाजिरवाणी मानली जात आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. केवळ चौकशीचे आश्वासन न देता, संबंधित इंजिनिअरवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
"जर मनरेगासारख्या पारदर्शक समजल्या जाणाऱ्या योजनेत असा उघड भ्रष्टाचार होत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना पाठीशी घालू नये. — हिंमत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सेनगाव.