हिंगोली-नांदेड महामार्गावर थरार! १२० फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरनला पेट; वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:54 IST2025-11-08T18:52:48+5:302025-11-08T18:54:10+5:30
हिंगोली-नांदेड महामार्गावर ‘बर्निंग ट्रक’चा थरार; आग कंटेनरमधील फ्रीजपर्यंत पोहोचली असती तर मोठा धोका निर्माण झाला असता

हिंगोली-नांदेड महामार्गावर थरार! १२० फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरनला पेट; वाहतूक ठप्प
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा (जि.हिंगोली) : हिंगोली ते नांदेड या महामार्गाने जात असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरने ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दिल्लीहून चेन्नईकडे हा ट्रक निघाला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हिंगोली मार्गे नांदेडकडे जात असताना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाती पुलावर या कंटेनर असलेल्या ट्रकने (आरजे १४/जीएन ३०३७) पेट घेतला. या कंटेनरमध्ये सुमारे १२० फ्रीज (रेफ्रीजरेटर) होते. कंटेनरच्या समोरील बाजूस चालकाच्या केबिनने अचानक पेट घेतला. या घटनेनंतर हा कंटेनर रस्त्याच्या पलीकडील बाजूस आडवा झाला. हेमंतकुमार कुंवर पालसिंग राजोरा (३८, रा.बुलंद, उत्तरप्रदेश) हा या ट्रकचा चालक आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस, आखाडा बाळपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रस्त्याच्या कडेलाच पेटलेला कंटेनर असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्ध्या तासापासून ठप्प पडली होती.
तर वाढला असता धोका
या कंटेनरच्या कॅबिनमध्ये आग लागली होती. ही आग पाठीमागील बाजू असणाऱ्या कंटेनरपर्यंत पोहोचली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण कंटेनरमध्ये १२० फ्रीज असून, आगीने या फ्रीजचा स्फोट होऊ शकतो. हिंगोली, कळमनुरी येथून अग्नीशमन बंबांना पाचारण केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.