चोरटे बँकेत शिरण्यास यशस्वी पण भारीभक्कम तिजोरी फुटलीच नाही;रिकाम्या हाताने काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:21 IST2022-11-01T14:20:38+5:302022-11-01T14:21:44+5:30
भारीभक्कम तिजोरी फुटली तर नाहीच शिवाय वजनदार असल्याने सोबतही नेता आली नाही

चोरटे बँकेत शिरण्यास यशस्वी पण भारीभक्कम तिजोरी फुटलीच नाही;रिकाम्या हाताने काढला पळ
- इस्माईल जाहगीरदार
वसमत (हिंगोली) : शहरातील मुख्य मार्गावरील जयकाली माता महिला नागरी बँकेवर दरोडा टाकून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. चोरट्यांना तिजोरी फोडण्यात यश न आल्याने २० लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.
वसमत शहरातील मामा चौक परिसरात असलेल्या जय काली माता महिला नागरी बँक आहे. आज पहाटे चोरट्यांनी बँकेच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आतील तिजोरी ओढत बाहेर आणली. तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाहीत. तिजोरी वजनदार असल्याने चोरट्यांनी तेथून रिकाम्या हातांनी पळ काढला. तिजोरीत यावेळी २० लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. तिजोरी न फुटल्याने मोठी रक्कम सुरक्षित राहिली आहे.
दरम्यान, सकाळी १० वाजता बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांना समोरील गेटचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ शहर पोलीसांना माहिती दिली. यावरून घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, शंकर हेंद्रे, कृष्णा चव्हाण आदिंनी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. पोलीस पुढील शोध घेत आहेत.