औंढा नागनाथ शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पतसंस्थेसह १२ दुकाने फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:56 IST2025-05-03T14:56:02+5:302025-05-03T14:56:34+5:30

सुदैवाने चोरट्यांना बँकेची तिजोरी उघडता आली नसल्यामुळे मोठी रक्कम सुरक्षित राहिली

Thieves break out in Aundha Nagnath city; 12 shops including a credit institution were broken into in a single night | औंढा नागनाथ शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पतसंस्थेसह १२ दुकाने फोडली

औंढा नागनाथ शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पतसंस्थेसह १२ दुकाने फोडली

- हबीब शेख
औंढा नागनाथ (हिंगोली) :
शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घालीत एका खाजगी पतसंस्थेसह १२ दुकाने फोडली. सदर घटना  सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून औंढा पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. २ मे च्या मध्यरात्री शहरातील पतसंस्थेसह बारा दुकानांचे शटर तोडण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

औंढा नागनाथ शहरात २ मे च्या मध्यरात्री १ ते ४:३० दरम्यान चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालीत मुख्य बाजारपेठेतील गोबाडे व ठाकूर कॉम्प्लेक्समधील १२ प्रतिष्ठानचे शटर वाकून रोखरक्कम चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. यामध्ये एका खाजगी बँकेसह सहा आपले सरकार सेवा केंद्र, चार मोबाईल शॉपी व एका आइस्क्रीम पार्लरचा समावेश आहे. सुदैवाने चोरट्यांना बँकेची तिजोरी उघडता आली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महिन्याभरापूर्वीच २७ मार्च रात्री शहरातील तीन दुकाने फोडून रोख रक्कम पळविण्यात आली होती, त्यातच पुन्हा एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकानांचे शटर तोडल्यामुळे व्यापारात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ह्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे, त्यात दोघे इसम दुकानांचे शटर वाकूवून चोरी करतांना दिसत आहेत. सीसीटीव्हीत कैद झाल्यानुसार दोन चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेत तब्बल चार ते साडेचार तास धुमाकूळ घातला असून  इतर साहित्याला हात न लावता केवळ गल्ल्यातील रोख रक्कमेची चोरी केली असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळी घटनेची माहिती मिळताच औंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी एस राहिरे, सपोनी अरुण नागरे, पोलिस उप निरीक्षक अफसर पठाण, जमादार वसीम पठाण, गजानन गिरी, सुभाष जैताडे, माधव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गोरे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला, त्यानंतर हिंगोली येथील स्थानिक गुन्हा शाखा व श्वान पथकास पाचारण करण्यात आले, यावेळी  श्वान किटीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु बसस्थानकापर्यंत येऊन श्वान मागे फिरले. दरम्यान घटनास्थळावरील बोटांच्या ठस्यांचे नमुने घेण्यात आले असून औंढा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सदर चोरीच्या घटनेत चोरी झालेल्या रोख रकमेचा एकूण आकडा उपलब्ध होऊ शकला नाही, औंढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप अशा कोणत्याही वस्तू चोरी केल्या नसून केवळ रोख रकमेचीच चोरी केली आहे, सदर एकत्रित रक्कम ६० हजार आसपास असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Thieves break out in Aundha Nagnath city; 12 shops including a credit institution were broken into in a single night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.