३ लाखांच्या शेतीमालाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:00 IST2018-06-06T00:00:41+5:302018-06-06T00:00:41+5:30
कळमनुरी तालुक्यातील चूंचा येथील एका आखाड्यावरील शटर वाकवून हळद आणि सोयाबीनचा अंदाजे तीन लाखांच्यावर माल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे.

३ लाखांच्या शेतीमालाची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील चूंचा येथील एका आखाड्यावरील शटर वाकवून हळद आणि सोयाबीनचा अंदाजे तीन लाखांच्यावर माल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे.
वारंगा फाटा ते हदगाव या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चुंचा ता. कळमनुरी येथील शेतकरी साईप्रसाद दिलीपराव देशमुख यांच्या शेतातील शेड मधील शटर वाकवुन ४ जून २०१८ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शटरमधील ६० सुती कट्टे ढोल केलेली हळद व २५ सुती कटे सोयाबीन चोरी गेले असल्याची घटना घडली आहे. ६० कट्टे हळदीचे किमान ६० किलो प्रतिकट्टा याप्रमाणे ३६ क्विंटल तर सोयाबीनचे २५ कट्ट्याचे अंदाजे १५ क्विंटल एवढा माल चोरट्यांनी चोरून नेला आहे. हळद व सोयाबीनचा मिळून अंदाजे ३ लाखांच्या वर माल चोरी झाला आहे. सोयाबीन हे शेतात पेरणीसाठी घरगुती बियाणे म्हणून वापरण्यासाठी शेतात नेऊन ठेवले होते असे शेतकऱ्याने सांगितले.
सदरील घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले आणि वारंगा फाटा येथील बीट प्रमुख अशोक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरी प्रकरणी तपासाकरिता श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते मात्र पाऊस पडला आणि अनेकांनी येथे येऊन पाहून गेल्याने श्वान माग काढू शकले नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून वारंगा फाटा व परिसरात हळद चोरीच्या घटना वाढत असतांना आखाडा बाळापूर पोलीसांना मात्र हे एक मोठे आव्हानच आहे. सदरील घटनेचा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.