स्टेअरींगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला; चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 18:27 IST2024-06-22T18:25:19+5:302024-06-22T18:27:47+5:30
वसमत ते परभणी मार्गावरील घडली घटना

स्टेअरींगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला; चालकाचा मृत्यू
वसमत (जि. हिंगोली): छत्रपती संभाजीनगरला रिकामे सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. याचदरम्यान ट्रक रस्ताकडेला उलटला. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान परभणी मार्गावर घडली.
वसमत शहरात २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक एचपी कंपनीचे गॅस सिलिंडर घेऊन आलेला होता. नंतर तो ट्रक रिकामे गॅस सिलिंडर घेऊन सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन निघाला होता. परभणी मार्गावर ट्रकचालक रियाज मोहम्मद शेख (वय ४०, रा. धुळे) यांचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्याकडेला उलटला. या अपघातात ट्रकचालक रियाज हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, इम्रान कादरी, केशव गारोळे, संदिप चव्हाण आदींनी जखमी चालकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी कदम यांनी गंभीर जखमी रियाज यांना तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.