स्पीड ब्रेकरवर गाडी हळू झाली अन् दागिन्यांनी भरलेली पर्स चोरट्यांनी अलगद पळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:37 IST2022-11-01T12:36:51+5:302022-11-01T12:37:25+5:30
सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ३ लाख ६८ हजारांच्या ऐवज पर्समध्ये असल्याची माहिती आहे

स्पीड ब्रेकरवर गाडी हळू झाली अन् दागिन्यांनी भरलेली पर्स चोरट्यांनी अलगद पळविली
कळमनुरी ( हिंगोली) :हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शिवनी खुर्द गावाजवळील एका गतीरोधकाजवळ दुचाकीची गती कमी होताच पाठमागून बाईकवरून आलेल्या दोघांनी दुचाकीवरील महिलेची पर्स पळविल्याची घटना सोमवारी ( दि. ३१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ३ लाख ६८ हजारांच्या ऐवज पर्समध्ये असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुधाकर गारुळे हे पत्नीसह हिंगोली- नांदेड महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान, शिवनी खुर्द गावाजवळील एका गतीरोधकाजवळ गोरुळे यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचाच फायदा घेत पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी गारुळे यांच्या पत्नीच्या खांद्यावरील पर्स अलगद काढून घेतली. काही कळायच्या आत चोरते तेथून पसार झाले.
पर्समध्ये सोन्याचांदीचे दागिने आणि एक स्मार्ट फोन होता. एकूण तीन लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे हे करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.