‘त्या’ शिक्षकांची वेतनवाढ रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:12 IST2018-07-12T00:12:01+5:302018-07-12T00:12:35+5:30
संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत घाबरगुंडी उडाली.

‘त्या’ शिक्षकांची वेतनवाढ रोखणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत घाबरगुंडी उडाली.
हिंगोली जिल्ह्यात पाच टप्प्यांमध्ये जवळपास अडीच हजार शिक्षक बदलीपात्र होते. यापैकी दीड हजारांच्या आसपास शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यापैकी काही शिक्षकांनी संवर्ग १, २ चा लाभ घेताना विविध प्रमाणपत्रे जोडली होती. त्यांची काटेकोर तपासणी झाली. तर पती-पत्नी एकत्रिकरणातही काहींनी पती व पत्नीच्या शाळेतील अंतर चुकीचे टाकले. ते ३0 किमीपेक्षा जास्त असणे अपेक्षित होते मात्र कमी आढळले. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून प्रमाणपत्रे तर बांधकाम विभागाकडून हे अंतर आधीच निश्चित करून घेतलेले होते. त्यामुळे या दोन्ही कारणांनी २0 जण थेट अपात्र ठरले. तर २१ जणांचे प्रमाणपत्र आॅनलाईन करण्यासाठी व फेरतपासणीस आरोग्य बोर्डाकडे पाठविले. याला महिन्याची मुदत दिली. या वेळेत ते न आल्यास अपात्र ठरण्याची भीती आहे.
अपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत काय निर्णय होईल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र त्यांना शिक्षा म्हणून एक वेतनवाढ रोखण्यात येईल, असे संकेत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिले आहेत. त्यामुळे केवळ बदली रद्द होईल, पुढे नवीन ठिकाण मिळेल, असे वाटणाऱ्या शिक्षकांना हा नवा हादरा बसणार आहे. याबाबतही आता अनेकजण विचारणा करीत असून गूगल मॅप व इतर बाबींचा दोष सांगत आहेत.