औंढा येथील गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:01 IST2018-12-07T12:52:16+5:302018-12-07T13:01:56+5:30
मृतदेह कुजलेले असल्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

औंढा येथील गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या
औंढा नागनाथ (हिंगोली ) : येथील गोकर्णाच्या माळावर एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतदेह कुजलेले असल्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
औंढा शहरापासूनच नजीकच असलेल्या गोकर्णाच्या माळावर आज सकाळी मजूर कामाला गेले होते. त्यांना दुर्गंधी जाणवत असल्याने आजूबाजूला पाहणी केली असता या प्रेमीयुगुलाचे प्रेत झाडावर लटकलेले आढळले. त्यांनी वन विभागाला कळविले. त्यानंतर औंढा व हट्टा पोलीसही दाखल झाले. या दोघांनी एकाच ओढणीने दोन टोकांना गळफास घेतला. तर झाडाखाली विषाची रिकामी बाटलीही आढळली.
यातील मुलीची ओळख अगोदर पटली. औंढा तालुक्यातील दरेगाव येथील ध्रुपता कुंडलिक निंबाळकर असून ती मागच्या शनिवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. औंढ्यात नागनाथ महाविद्यालयात ती बारावीत शिकत होती. वडिलांनी तिचा शोध घेवूनही ती सापडत नव्हती. आज तिचा मृतदेहच आढळून आला. तो निंबाळकर यांनी ओळखला आहे. मुलाची ओळख पटणे बाकी आहे. दोघांचेही प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन केले जाणार आहे.