बोलघेवडे सरकार अन् विरोधकांचा फार्स; रस्त्यावरील शेताची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यासाठी पायऱ्यांची सोय...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 13:29 IST2020-10-22T13:27:40+5:302020-10-22T13:29:44+5:30
Rain Hits Farmer सरकार बोलघेवडे आहे असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांचा दौराही निव्वळ औपचारिकच ठरला.

बोलघेवडे सरकार अन् विरोधकांचा फार्स; रस्त्यावरील शेताची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यासाठी पायऱ्यांची सोय...!
वसमत (जि. हिंगोली) : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वसमत तालुक्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी आले होते. त्यांच्यासाठी रस्त्यावरच्या शेताची पाहणी करतानाच शेतात उतरण्यासाठी मुख्य रस्त्यावरून चक्क पायऱ्यांची सोयही केली होती. राज्य सरकार बोलघेवडे अन् विरोधकांचा फार्स, अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडले असल्याचे चित्र समोर आले आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने हातात आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीसोबतच शेतीही वाहून गेली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत मदतीची कोणतीही घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांसह मंत्री नुकसानीची पाहणी करत आहेत. याचवेळी विरोधी पक्षनेते फडणवीस हे सुद्धा नुकसानीची पाहणी करत आहेत. वसमत तालुक्यातही पाहणी केली. परभणी, हिंगोली पालखी मार्ग या मुख्य रस्त्यालगत शेतात पाहणीसाठी जागा निश्चित केली. रस्त्यामुळे शेत खोल व रस्ता उंच अशी अवस्था होती. शेतात उतरणे सोपे व्हावे यासाठी माती खोदून पायऱ्या करण्यात आल्या होत्या.
रोड टच शेताजवळील रस्त्यावर विरोधी पक्षनेत्याचा ताफा उतरला. पायऱ्या उतरुन शेतात उतरला. रस्त्यापासून जेमतेम २५ ते ३० फुट अंतरावर येवून पाहणी केली. यावेळी शेतकरी कमी अन् कार्यकर्त्यांचा ताफाच जास्त असा प्रकार पहावयास मिळाला. फोटो सेशन करण्यात आले. सरकार बोलघेवडे आहे असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांचा दौराही निव्वळ औपचारिकच ठरला.