एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 19:27 IST2021-03-17T19:27:12+5:302021-03-17T19:27:25+5:30
हिंगोली राज्य राखीव दलात राजकुमार उत्तमराव पवार (४२) हे कार्यरत होते. १६ मार्च राेजी जांभळी तांडा येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले होते.

एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय
डिग्रस कऱ्हाळे (हिंगाेली) : येथून जवळच असलेल्या लोहगाव शिवारातील आश्रमशाळेच्या पाठीमागील बाहेती यांच्या विहिरीत एसआरपीएफ जवानाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत बुधवारी सकाळी आढळून आला आहे. त्यांच्या डाेक्याला मार असल्याने घातपाताचा संशय व्यक्त हाेत आहे.
हिंगोली राज्य राखीव दलात राजकुमार उत्तमराव पवार (४२) हे कार्यरत होते. १६ मार्च राेजी जांभळी तांडा येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. रात्री ७ वाजता जेवण करून जांभरून तांडा येथील मावशीला भेटून कारने (एमएच २६ व्ही ३४७१) हिंगोलीला येत होते. लोहगावजवळील भोसी - हिंगोली रोडवर लाेहगाव परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. त्यांच्या डोक्यास मार लागलेला असल्याचे निदर्शनास आल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पाेलीस उपअधीक्षक यशवंत काळे, यतिश देशमुख, खंडेराय, पोटे, बी. एच. कांबळे, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह हिंगोली जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. मयत राजकुमार पवार हे व्हाेडगीर, ता. सेनगाव येथील रहिवासी असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.