"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST2023-08-27T16:48:01+5:302023-08-27T16:48:22+5:30
भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर उपरे नाचतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला
"डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय. हे नुसते हवेत थापांच्या वाफा सोडतायत. सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी असं सुरुये. मी मागेही बोललो होतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. भाजपमध्ये जे चाललंय सगळं चाललंय ते म्हणजे सगळं आयाराम," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिगोलीत आयोजित सभेत त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.
मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. अनेक वर्ष आपण युतीत होतो, अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष वाढीसाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल वाटायचं, पण हे राहिले दांड्यापुरते. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर हे उपरे नाचतायत. एवढ्यासाठी भाजप वाढवायला मेहनती केली का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आजही त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांबद्दल दया असल्याचं ते म्हणाले.
अजून किती डबे लागणार?
"डबल इंजिन सरकारला आता अजित दादांचा आणखी एक डबा लागलाय. अजून किती डबे लागणार, मालगाडीच होतेय. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करायचं कर्तुत्व नाही का? तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का?" असंही ते म्हणाले.
टरबूजालाही पाणी द्यावं लागतं
'एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली.