शिरडच्या सरपंचास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:35 IST2018-05-05T00:35:14+5:302018-05-05T00:35:14+5:30
नळाचे कनेक्शन का देत नाही, असे विचारण्यासाठी आलेल्यांनी माझ्या घरात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत साहित्याची नासधूस केल्याची तक्रार शिरडशहापूरच्या सरपंच नंदा ठोंबरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल केली

शिरडच्या सरपंचास शिवीगाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : नळाचे कनेक्शन का देत नाही, असे विचारण्यासाठी आलेल्यांनी माझ्या घरात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत साहित्याची नासधूस केल्याची तक्रार शिरडशहापूरच्या सरपंच नंदा ठोंबरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. सध्या नळांना ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागात नळ व हातपंप नसल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. वार्ड क्र. २ मधील हातपंप नसल्यामुळे ग्रा.प. सदस्यांनी ठराव घेऊन हातपंपावरून पाईपलाईनद्वारे तात्पुरती उपाययोजना करण्याचे ठरले. पाईपलाईनसुद्धा टाकण्यात आली; परंतु कनेक्शन न केल्यामुळे काम थांबले. काम का थांबवले, असे विचारण्यासाठी काही जण ग्रा.पं. कार्यालयात गेले; परंतु तेथे सरपंच उपस्थित नसल्यामुळे ते सर्वजण सरपंच नंदा ठोंबरे यांच्या घरी गेले. तेथे नळजोडणीबाबत विचारणा केली. परंतु सरपंच म्हणाल्या की, त्या कामाचा ठराव नाही. त्यामुळे कनेक्शन करत नसल्याचे सांगितले. यावरून काहींनी ते जोडण्यासाठी वाद घातला.
या घटनेबाबत ठोंबरे यांनी कुरुंदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नळाचे कनेक्शन का देत नाही म्हणून माझ्या घरात घुसून खुर्च्याची नासधूस केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यात शे. गुलाब नबी, रिजवान बेग, शेख नजीब, शेख मुन्ना व इतर १० ते १५ जण असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपींवर कलम १४३, १४७, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह कलम ३(१) (आर)(५) अजाज अप्रका सुधारित कायदा सन २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद करीत आहेत.
गुन्हा मागे घेण्याची मागणी
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच यांनी अॅट्रॉसिटीचा दाखल केलेले खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी गावातील नागरिकांनी औंढा तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आम्ही त्यांच्या घरी जावून समस्या मांडून निघून गेलो, परंतु सरपंच नंदा ठोंबरे यांनी गावातील काही नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, असे निवेदनात म्हटले यावेळी जि.प.सदस्य श्रीशैल्य स्वामी, माजी उपसभापती जावेद कादरी, साहेबराव शेळके, लक्ष्मण जोगदंड, स. सादुल्ला, दत्तराव वेणीकर, अनिल सूर्यतळ, ग्रा.पं.सदस्य सीताराम गजभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.