'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड
By विजय पाटील | Updated: November 22, 2023 17:52 IST2023-11-22T17:50:49+5:302023-11-22T17:52:00+5:30
पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबलतेने हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड
सेनगाव : आमची किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या, असे निवेदन तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केले आहे. सोयाबीन व कापसाला भाव मिळत नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबलतेने हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.
खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ग्रामीण भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. सोयाबीन, कपाशी आदी पिकाना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले पहायला मिळत आहे.यामुळे हतबल झालेल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी किडनी ७५ हजार रुपये, लिव्हर ९० हजार, डोळे २५ हजार रुपये असे रेटकार्ड काढत स्वतःचे अवयव विकत घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खाजगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून आम्ही खरीपात पेरण्या केल्या आहेत. मात्र, नंतर पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक उध्वस्त झाले. बोंडअळी लागल्यामुळे कापसाला उभारी नाही. त्यामुळे बँकेचे पीककर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे अवयव खरेदी करून बँकेचे कर्ज परतफेड करावे, अशी मागणी करणारे एक निवेदन या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले आहे. निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.