हिंगोली बाजार समितीत संत नामदेव पॅनलची आघाडी
By विजय मुंडे | Updated: April 29, 2023 12:48 IST2023-04-29T12:48:14+5:302023-04-29T12:48:34+5:30
निकाल जाहीर झालेल्या सातपैकी पाच जागा या पॅनलने जिंकल्या असून सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही उमेदवार आघाडीवर आहेत.

हिंगोली बाजार समितीत संत नामदेव पॅनलची आघाडी
हिंगोली : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत संत नामदेव शेतकरी विकास पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. निकाल जाहीर झालेल्या सातपैकी पाच जागा या पॅनलने जिंकल्या असून सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही उमेदवार आघाडीवर आहेत.
हिंगोली बाजार समितीत ग्रामपंचायत मतदारसंघात संत नामदेव शेतकरी विकास पॅनलचे शंकर पाटील, परमेश्वर मांडगे, बबन नेतने हे तीन उमेदवार आज विजयी झाले. तर गजानन घ्यार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्रितपणे हा पॅनल उभा केला आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांना यशही मिळत असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार घुगे विजयी
माजी आमदार गजानन घुगे यांना भाजपने आपल्या पॅनलमध्ये स्थान दिले नव्हते. मात्र तरीही व्यापारी मतदारसंघातून त्यांनी विजयश्री खेचून आणली. तर शिंदे गटाचे अशोक मुंदडा हे विजयी झालेले दुसरे उमेदवार आहेत. भाजपचे प्रशांत सोनी यांना पराभवाचा धक्का बसला. आ.तान्हाजी मुटकुळे व आ.संतोष बांगर यांच्या विरोधानंतरही घुगे यांनी बाजी मारली, हे विशेष. तर हमाल मापारी मतदारसंघात माजी संचालक बुऱ्हान पहेलवान हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनाही प्रचंड विरोध झाला होता.