वाळू तस्करांची मुजोरी; मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ट्रॅक्टर चालकाची धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:25 IST2025-12-11T15:20:25+5:302025-12-11T15:25:01+5:30
आखाडा बाळापूर सज्जाच्या मंडळ अधिकारी यांनी यासंदर्भात कळमनुरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

वाळू तस्करांची मुजोरी; मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ट्रॅक्टर चालकाची धूम
हिंगोली : अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह तेथून धूम ठोकल्याची घटना ९ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर सज्जाच्या मंडळ अधिकारी शिल्पा अरुण सरकटे यांनी यासंदर्भात कळमनुरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार ९ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साडेगाव ते नांदापूर फाटा या रस्त्यावर ट्रॅक्टर चालकाला त्यांनी थांबविले. त्यावेळी एम. एच.२२ ए. डब्ल्यू. ४८२९ या क्रमांकाच्या कारचा चालक व अन्य एक मोटारसायकल चालक यांनी ट्रॅक्टर अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने पळून गेला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक ऋषिकेश नीळकंठे, भागवत नीळकंठे व कार चालकाविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सालेगाव शिवारातही असाच प्रकार
कळमनुरी तालुक्यातील सालेगाव शिवारात ९ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता आणखी एक असाच प्रकार घडला आहे. सालेगाव शिवारातील रस्त्यावर ट्रॅक्टर चालक व मालक नितीन गुठ्ठे हे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करीत असल्याने ग्राम महसूल अधिकारी गणेश धाडवे, अभय मोहोळ, सुनील भुक्तर, कलमकुमार यादव, कैलास मोगले, विनोद घुगे, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांच्या मदतीने या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वाळू असल्याचे निदर्शनास आले. या ट्रॅक्टरची तपासणी करत असताना चालकाने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत ट्रॅक्टरसह तेथून पळ काढला. याप्रकरणी महसूल मंडळ अधिकारी गजानंद तेलेवार यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मालक नितीन गुठ्ठे याच्याविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.