भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

By सुमेध उघडे | Published: November 11, 2022 08:19 PM2022-11-11T20:19:49+5:302022-11-11T20:20:53+5:30

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज पाचवा दिवस असून आज हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे.

Remembering Late Rajiv Satav in Bharat Jodo Yatra; Rahul Gandhi became emotional at the memory at Kalamuri | भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

googlenewsNext

कळमनुरी ( हिंगोली): खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रा आज दुपारी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. नांदेड-हिंगोली सीमेवर भव्य प्रवेशद्वार उभा करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, काही अंतरांवर गेल्यानंतर खा. राहुल गांधी यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. यावेळी हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण करत खा. राहुल भावूक झाले. जुने सहकारी राजीव सातव यांचे खा. राहुल आणि गांधी कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचा उल्लेख निघताच पदयात्रेतील अनेकांनी सातव यांची उणीव जाणून येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

सातव आणि गांधी कुटुंबात अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजीमंत्री रजनी सातव यांनी १९८० ते ९० दरम्यान या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजीव २००९ मध्ये येथून आमदार झाले. दरम्यान, राजीव सातव हे युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदापासून राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. अल्पवधीतच त्यांनी राज्यभर कामाचा ठसा उमटवला. राज्य युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील सांभाळले. त्यांनी हिंगोली लोकसभेची २०१४ ची निवडणूक लढवली. मोदी लाटेत देखील ते निवडणून आले होते. यावेळी पूर्व नियोजित नसताना देखील राहुल गांधी यांनी हिंगोलीत सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी गुजरात विधानसभा प्रभारी म्हणून पक्षाला मोठे यश प्राप्त करून दिले. राजकीय क्षितिजावर  प्रभावी कार्य सुरु असताना कोरोना काळात १६ मे २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. सातव यांचे अकाली निधन गांधी परिवार, कॉंग्रेस यांच्यासह अनेकांना धक्का होता. 

राजीव सातव यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते
तरुण, तडफदार राजीव सातव राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे होते. यामुळेच आज भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात आली असता खा. राहुल यांना आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण दाटून आली. राजीव सातव आपल्यात नाहीत. त्यांची आज आठवण येत आहे, असे बोलून खा. राहुल भावूक झाले. देशभरात भारत जोडो यात्रेने खा. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला वेगळी ओळख करून दिली आहे. पक्ष संकटात असताना अनेक जुने नेते सोडून गेले. विरोधक अत्यंत आक्रमक व्यूहरचना आखत असताना खा. राहुल गांधी यांना अत्यंत विश्वासू अशा राजीव सातव यांची कमतरता जाणवत असेल यात शंका नाही. यात्रेत त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते अशा भावना पदयात्रेत सहभागींनी व्यक्त केल्या. दरम्यान, दिवंगत राजीव सातव यांच्या कळमनुरी येथील समाधीचे खा. राहुल गांधी दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. 

सातव यांच्या निधानावेळी राहुल गांधी म्हणाले होते...
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "राजीव सातव यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. ते खूप ताकदीचे नेते होते. हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे." काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं, "आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला आहे. ते मनानं अगदी निर्मळ होते. काँग्रेस पक्षाच्या मूल्यांशी ते घनिष्ठ होते. तसंच भारताच्या जनतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं. माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांसाठी मी प्रार्थना करते." दरम्यान, राजीव सताव यांच्या निधनानंतर गांधी कुटुंब सातव कुटुंबाच्या कायम संपर्कात आहे. राजीव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सध्या विधानपरिषद आमदार आहेत. 

Web Title: Remembering Late Rajiv Satav in Bharat Jodo Yatra; Rahul Gandhi became emotional at the memory at Kalamuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.