फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:13 IST2025-03-27T14:09:58+5:302025-03-27T14:13:24+5:30

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे.

Recruitment for Maharashtra, but exam in Gujarat; Gandhinagar is the only center for forensic students | फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये

फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये

हिंगोली : राज्याच्या गृहविभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पदभरती करण्यासाठी ५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जात आहे. गुजरातच्या एजन्सीमार्फत ही परीक्षा होत असून, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी जरी पदभरती असली तरी परीक्षेचे केंद्र मात्र गुजरातमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये १७ डिसेंबर २०२४च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत वैज्ञानिक सहायक ही पदे फॉरेन्सिक ॲप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (एफएसीटी) ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून भरली जात आहेत. तर सहायक रासायनिक विश्लेषकांची १६६ पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी ५ व ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबसाठी ही पद भरती होत आहे. तेव्हा साहजिकच महाराष्ट्रातून अनेक उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकही केंद्र नाही. गुजरात येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, शासनाने या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडे घेतली धाव
या प्रकारानंतर फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असून, ही भरती राज्यातील फॉरेन्सिक लॅबसाठी केली जात असून, यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु या परीक्षेसाठी महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. तेव्हा महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Recruitment for Maharashtra, but exam in Gujarat; Gandhinagar is the only center for forensic students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.