उप सरपंचाची निवड न केल्याने गमवाव लागले सरपंच पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:44 IST2019-01-31T16:42:34+5:302019-01-31T16:44:04+5:30
ग्रामविकास मंत्री यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेला निकाल कायम ठेवला

उप सरपंचाची निवड न केल्याने गमवाव लागले सरपंच पद
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील सरपंच नंदाबाई बालाजी ठोंबरे यांना सरपंच पदावरुन विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयावरील आक्षेप ग्रामविकास मंत्र्यांनी ग्राह्य न धरता उपसरपंचाची निवड करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई योग्य ठरवली.
ग्रा.पं. सदस्य सय्यद कुतुब सय्यद हुसेन यांनी विभागीय आयुक्ताकडे शिरड शहापूर येथील सरपंच नंदाबाई बालाजी ठोंबरे या उप सरपंच पदाची निवड करत नसल्याची तक्रार केली होती. यावर कारवाई करत २० मे २०१८ रोजी विभागीय आयुक्तांनी नंदाबाई ठोंबरे यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपिल दाखल केले होते.
३० जानेवारी रोजी ग्रामविकास मंत्री यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेला निकाल कायम ठेवत सरपंच ठोंबरे यांना अपात्र घोषीत केले. उपसरपंच पदाची निवड न करणे हे एकमेव कारण ग्राह्य धरत सरपंच पदावरुन पायऊतार होण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहेत.