गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:49+5:302021-02-06T04:54:49+5:30
स्वच्छतागृहाचा वापर होईना हिंगोली : नगर परिषदेतर्फे स्वच्छता माेहिमेतंर्गत शहरातील मुख्य चौक व शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह ...

गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था
स्वच्छतागृहाचा वापर होईना
हिंगोली : नगर परिषदेतर्फे स्वच्छता माेहिमेतंर्गत शहरातील मुख्य चौक व शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारले आहे, पण या स्वच्छतागृहात स्वच्छता नसून याठिकाणी नेहमी दुर्गंधी राहत आहे. यासाठी अनेक नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर न करता बाहेरच लघुशंकेसाठी बसत आहेत.
बसस्थानक परिसरात केरकचरा
सेनगाव : शहरातील बसस्थानक परिसरात केरकचरा मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. या बसस्थानकाच्या आजूबाजूला पानटपऱ्यासह फळांचे दुकान आहे. पानटपऱ्यातील पाणी पाऊच, गुटखा पुड्यासह अनेक फळांचे टरफल बसस्थानक परिसरात नागरिक टाकीत आहेत. यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
बासंबा फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न मिटेना
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा ते बासंबा गावापर्यंत असणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे. याचबरोबर जागोजागी हा रस्ता खराब झाला आहे. अनेक गावकऱ्यांना दररोज हिंगोली शहराकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागत असून या रस्त्यावरून ये - जा करताना गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित
औंढा ना.: तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील दोन महिन्यांपासून गावात विद्युतचा अप - डाऊनचा खेळ सुरू आहे. यामुळे गावातील अनेकांचे विजेची उपकरणे जळाली आहेत. गावकऱ्यांनी अनेकदा गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी करूनही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही.
गावातील सांडपाणी रस्त्यावर
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात नालीचे व्यवस्थापन बरोबर नसल्याने गावकऱ्यांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर जमा होत आहे. गावात कच्चे रस्ते असून नालीचे व्यवस्थापनही बरोबर नाहीत. गावकऱ्यांच्या घरातील पाणी हे नालीत न जाता गावातील रस्त्यावर जमा होत असल्याने अनेक भाागतील गावकरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढीत आहेत.
गावात वन्यप्राण्यांची भटकंती
बासंबा : सध्या उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत आहे. गावातील अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत आहेत. यामुळे गावाजवळ असलेल्या माळरानातील अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळी गावात शिरत आहेत. कोल्हे, ससे, हरीण, निलगाय, रोही आदी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावात रात्रीच्या वेळी भटकंती करताना दिसून आले आहेेत.
गावात पाणीटंचाईचे चटके
हिंगोली : तालुक्यातील ग्रामीण भागातील विहीर, नाले, ओढे आटत आले आहेत. यंदा चांगला पाऊस होवूनही गावातील पाण्याचे स्त्रोत आटत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांतील गावकरी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामस्थ विकतचे पाणी आणून आपल्या गरजा पूर्ण करीत आहेत.
रस्त्यावर मोठे खड्डे
हिंगोली : शहरातील अकोला बायपास ते वाशिमकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दुचाकीसह जड वाहनांची वर्दळ असते. अनेकदा रस्त्यावर असणारे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. तसेच मागून धावणाऱ्या जड वाहनांमुळे याठिकाणी मोठा घातपात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.