श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी नागनाथ मंदिरात हरहर महादेवचा गजर, भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:08 IST2025-07-28T14:07:16+5:302025-07-28T14:08:01+5:30
श्री नागनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी रविवारपासूनच भक्तांची मोठी गर्दी जमली होती.

श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी नागनाथ मंदिरात हरहर महादेवचा गजर, भाविकांची अलोट गर्दी
- हबीब शेख
औंढा नागनाथ (हिंगोली): "हरहर महादेव" चा जयघोष करत, देशभरातून हजारो शिवभक्त श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला श्री नागनाथ मंदिर परिसरात दाखल झाले. रात्री १२:३० वाजता, आमदार संतोष बांगर आणि त्यांची पत्नी गोदावरी बांगर यांनी नागनाथ प्रभूंच्या पवित्र मंदिरात दुग्धाभिषेक करून महापूजा अदा केली. यानंतर, रात्री दोन वाजता, भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पहाटे चार वाजता श्री नागनाथ प्रभूंच्या समक्ष दुग्धाभिषेक करून महापूजा केली. पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी, देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी रविवारपासूनच भक्तांची मोठी गर्दी जमली होती. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश या विविध राज्यांतील हजारो शिवभक्त औंढा नागनाथ शहरात दाखल झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात विधिवत पूजा केली गेली आणि रात्री दोन वाजता दर्शन सुरू करण्यात आले. या दरम्यान, "हरहर महादेव", "बम बम भोले", "ॐ नमः शिवाय" या गजराने मंदिर परिसर पंढरपूर झाले. द्वारपालांच्या व्यवस्थेत आणि धार्मिक उत्साहात, सकाळी आठ वाजेपर्यंत २०,००० भाविकांनी श्री नागनाथ प्रभूंचे दर्शन घेतले, अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी दिली.
गाभाऱ्यात आकर्षक सजावट:
श्रीनागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात झेंडूसह, निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती आणि अन्य विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि भव्य देखाव्याने वातावरण मनोहर बनले होते.
भाविकांची अलोट गर्दी:
रविवारी मध्यरात्रीपासूनच, मंदिर परिसरात हजारो भक्त रांगेत उभे होते. त्यांची सोय करण्यासाठी मंदिर संस्थानने पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, अल्पोपाहार आणि दर्शन रांगेतील व्यवस्थापन केले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पोलिस बंदोबस्त:
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी, तालुका प्रशासन आणि पोलिस विभागाने एक तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, सहा पोलिस निरीक्षक, १९ पोलिस अधिकारी, १०३ पोलिस कर्मचारी, ३० महिला पोलिस, १०५ होमगार्ड, आणि विशेष पथकांची तैनाती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण प्रशासनाच्या प्रयत्नामुळे, भाविकांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरणात दर्शन घेता आले.