हिंगोलीत शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:35 IST2018-08-09T18:34:10+5:302018-08-09T18:35:20+5:30
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.

हिंगोलीत शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.
सिंदगी शिवारात आपल्या शेतात हे दोघे मायलेक कामाला गेले होते. दुपारच्या जेवणासाठी शेततळ्यानजीक एका झाडाखाली बसले होते. जेवण झाल्यानंतर प्रभाकर विठ्ठल मगर (वय २२) हा शेततळ्यावर पाणी पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याची आई विजयमाला ही नजीकच जेवणाला बसलेली होती. पोटचा गोळा पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला पोहणे येत असल्याने तिने हे धाडस केले. मात्र यामध्ये तिचाही करुण अंत झाला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमले. पंजाबराव मगर यांनी याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी जमादार दादाराव सूर्य व दोन होमगार्ड गेले. बोल्डा येथे बंदोबस्तासाठी असल्याने ते लवकर घटनास्थळी पोहोचले. या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. याबाबतची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.