'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी
By यशवंत भीमराव परांडकर | Published: May 3, 2024 06:38 PM2024-05-03T18:38:30+5:302024-05-03T18:41:23+5:30
दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली): यंदा निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शासन आदेश असूनही बँकांकडून पीककर्ज पुनर्गठन केले जात नाही. तेव्हा खत, बियाणे खरेदी व खरिपाच्या पेरणीचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यामुळे आमच्या किडन्या गहाण ठेवून पीककर्ज द्या, अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून ३ मे रोजी लेखी निवेदनाद्वारे बँक शाखाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
गत खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. तर रब्बी हंगामातही अवकाळीच्या घाल्यामुळे पिकांची नासाडी झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना उत्पन्न घटीचा दुहेरी फटका सहन करावा लागला आहे. एकंदरीत निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र आहे. अगोदरच पीक कर्जापायी शेतजमिनी बँकांकडे गहाण असल्याने बँक कर्ज देईना. दुष्काळ परिस्थितीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन आदेश असताना पुनर्गठन ही करण्यास नकार दिला जात आहे. तेव्हा पुढील खरीप हंगामासाठी खत बी-बियाणे खरेदी व पेरणीचा खर्च भागवायचा कसा ? असा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांनी दिले बँक शाखाधिकाऱ्यांना निवेदन...
आमच्या किडन्या गहाण ठेवून किंवा विकत घेऊन आम्हाला ‘ पीककर्ज द्या’ अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी ३ मे रोजी गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर संगीता पतंगे, दसरथ मानमोठे, पांडुरंग मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय कावरखे, रामराव पतंगे, विकास सावके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.