जन्मदात्या पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीमुळे आले उघडकीस

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: September 12, 2023 14:18 IST2023-09-12T14:16:40+5:302023-09-12T14:18:07+5:30

मुलीवरील अत्याचाराचा जाब विचारातच पत्नीला जीवे मारण्याची धमकी

minor girl raped by biological father | जन्मदात्या पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीमुळे आले उघडकीस

जन्मदात्या पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीमुळे आले उघडकीस

हिंगोली : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला. मुलीची प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झाल्यानंतर या प्रकाराचे बिंग फुटले. या प्रकरणी  नराधम पित्याविरूद्ध बासंबा पोलिस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.

हिंगोली तालुक्यातील एक कुटुंब १७ वर्षीय मुलीसोबत पुणे जिल्ह्यात कामानिमित्त गेले होते. २१ डिसेंबर २०२२ रोजी पित्याने अल्पवयीन मुलीस झोपेतून उठवून बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतरही नराधम पित्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकाराची माहिती तिच्या आईला समजल्यानंतर नराधम पित्याला जाब विचारला. मात्र तिच्या आईला देखील जिवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, मागील आठ दिवसांपूर्वी हे कुटुंबीय तालुक्यात परतले होते. गरोदर अल्पवयीन मुलीस शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिने एका बाळास जन्म दिला. या प्रकाराने तिच्यावर अत्याचार झाल्याचे बिंग फुटले. या प्रकाराची माहिती मिळताच बासंबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक खरात, जमादार खंडेराय नरोटे यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन त्या मुलीची चौकशी केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिच्या पित्याविरुध्द गुन्हा नोंद केला.

Web Title: minor girl raped by biological father