खेळीमेळीच्या वातावरणात हिंगोली न.प.ची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:33 IST2018-11-01T00:27:39+5:302018-11-01T00:33:10+5:30
नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

खेळीमेळीच्या वातावरणात हिंगोली न.प.ची सभा
हिंगोली : नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी विविध योजनांतील कामांना मुदतवाढ देण्याच्या मुद्यावर नगरसेवकांनी कामे व मुदतवाढीबाबत विचारणा केली. तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील २ कोटींतून होणाऱ्या कामांची यादी वाचवून दाखविण्यात आली. तर लाड कमिटीच्या शिफारसींनुसार कर्मचा-याच्या वारसास नियुक्ती देण्याच्या प्रकरणांवरही चर्चा झाली. तर सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवा करार पद्धतीने घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
हिंगोलीत कयाधू नदीवर बंधारे बांधून शहरानजीकच्या भागात पाणीपातळी वाढण्यासाठी कामे घेण्याचे ठरले. तर खडकपुरा येथे अण्णा भाऊ साठे समाजमंदिराच्या नवीन बांधकामाचा ठराव झाला. प्रभाग क्र.३ मध्ये राष्ट्रध्वज उभारणीचा ठराव नगरसेवक नरसिंग नायक व अनिता गुट्टे यांनी मांडला होता. त्यांनीच या बाबीच्या सन्मानाची जबाबदारी स्वीकारल्यास हे काम घेण्यास मंजुरी देण्यात आली. तर सिद्धविनायक गणपती मंदिराच्या खुल्या जागेत टीनशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंगोली शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानात ३ स्टार रेटिंग आदीबाबत ठराव घेण्यात आला.
शहरात पडलेले बिल्डिंग मटेरियल दंडाची रक्कम ठरवून वाहतूक खर्च घेण्यासही मान्यता दिली. यात दंडाच्या रक्कमेवर एकवाक्यता नसल्याने प्रशासनाने निर्णय घेण्यास सांगितले. प्रभाग क्र.१६ मध्ये पथदिवे बसविण्याची मागणी नगरसेविका स. नाजनिन जावेद यांनी केली होती. त्यास मान्यता दिली.
डेंग्यूमुळे धूर फवारणीच्या मागणीला जोर
स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेबाबत संबंधित नगरसेवकाकडून प्रमाणपत्र घेण्यापूर्वी त्याच्या भागातील अडचणी जाणून घेण्याची मागणी नगरसेविका नाईक यांनी केली. संबंधित नगरसेवकाने सांगितलेली स्वच्छतेची कामेही झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कंत्राटी कर्मचारी निविदेद्वारे नेमले तरीही कर्मचारीसंख्या अपुरीच असते. स्वच्छतेची समस्या घेवून गेल्यावर हेच ऐकायला मिळते, असा आरोप स.नाजनीन यांनी केला. तर पंधरा-पंधरा दिवस सफाई होत नसल्याचे नगरसेवक कय्यूम यांनी म्हटले. त्यावर लगेच कारवाईचा आदेश नगराध्यक्ष बांगर यांनी दिला. अनेक नगरसेवकांनी शहरात सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसोबतच धूरफवारणीची मागणी केली. अशी फवारणी सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.