वीजचोरीचे पुरावे नष्ट करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; दोघांना एक वर्षाचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:43 IST2025-07-14T13:42:24+5:302025-07-14T13:43:16+5:30
वाढोणा शिवारातील शिव स्टोन क्रेशरवर महावितरणचे पथक तपासणीसाठी गेले असतानाची घटना

वीजचोरीचे पुरावे नष्ट करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; दोघांना एक वर्षाचा कारावास
हिंगोली : शासकीय कामात अडथळा आणल्याचे सिद्ध झाल्याने येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. जी. देशमुख यांनी दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास आणि १० हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ११ जुलै रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. महावितरणचे तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक शिंदे हे ३० मार्च २०२३ रोजी पथकासह वाढोणा शिवारातील शिव स्टोन क्रेशरवर तपासणीसाठी गेले होते. यावेळी वीज जोडणीत अतिरिक्त वायर टाकून मीटरमध्ये फेरफार करत वीजचोरी होत असल्याचे त्यांना आढळले. यावेळी आरोपी माणकेश्वर देशमुख यांनी शिंदे यांच्याशी वाद घालत अतिरिक्त वायर काढून वीजचोरीचे पुरावे नष्ट केले. तसेच मीटर काढण्यास विरोध करत माणकेश्वर देशमुख व मोतीराम ढोले यांनी मारहाण केली.
या प्रकरणात ९४,३४१ युनिटची वीजचोरी झाली होती, ज्याची तडजोड रक्कम ९ लाख ६० हजार रुपये होती. या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला, अशी फिर्याद विनायक शिंदे यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी तपास करून हे प्रकरण न्यायालयात दाखल केले.
हे प्रकरण तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. जी. देशमुख यांच्यासमोर चालले. सुनावणीअंती, आरोपी माणकेश्वर रावसाहेब देशमुख आणि मोतीराम निवृत्ती ढोले यांना भादंवि कलम ३५३ नुसार एक वर्ष कारावास व १०,५०० रुपये दंड आणि कलम ३३२ नुसार एक वर्ष कारावास व १०,५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावी लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला.
या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. एस. डी. कुटे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली, तर त्यांना सरकारी वकील सविता देशमुख यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवीसाठी पोलिस कर्मचारी पी. ए. मारकड यांनी मदत केली.