विश्वचषक जिंकूनही महाराष्ट्राच्या कन्येला उपेक्षा; दिव्यांग उपकर्णधार गंगा कदमला शासनाकडून 'शून्य' मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:30 IST2025-12-06T15:25:37+5:302025-12-06T15:30:01+5:30
जिद्दीचा विश्वविजय, तरी उपेक्षा का? इतर राज्यांच्या खेळाडूंना बक्षिसे, पण महाराष्ट्राच्या एकमेव प्रतिनिधीला फक्त कौतुकाचे शब्द.

विश्वचषक जिंकूनही महाराष्ट्राच्या कन्येला उपेक्षा; दिव्यांग उपकर्णधार गंगा कदमला शासनाकडून 'शून्य' मदत
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा (जि. हिंगोली) : भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर बक्षिसांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र, भारताच्या महिला दिव्यांग क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर या संघाची उपकर्णधार आणि महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू असलेल्या गंगा संभाजी कदम हिच्या कामगिरीची शासन, प्रशासनाकडून उपेक्षा झाल्याची भावना निर्माण होत आहे.
कोलंबो श्रीलंका येथे पी. सारा ओव्हल मैदानावर टी-२० दिव्यांग विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग महिला क्रिकेट संघाने नेपाळच्या संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. उल्लेखनीय बाब म्हणजे कळमनुरी तालुक्यातील फुटाणा या गावची गंगा संभाजी कदम ही भारतीय संघाची उपकर्णधार होती. तसेच संघात असणारी ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती.
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा गावची ही कन्या. प्राथमिक शिक्षण फुटाण्यात पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती सोलापूरला गेली आणि तेथेच तिच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाने क्रिकेटचे धडे गिरवले आणि दिव्यांग क्रिकेटमधील ती एक तेजस्वी नाव म्हणून उदयास आली.
श्रीलंकेत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळचा पराभव करीत विजेतेपदावर आपली छाप उमटवली. या स्पर्धेत गंगा कदमने उपकर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत संघाला भक्कम पाठबळ दिले. तिच्या खेळाचे आणि जिद्दीचे देशभर कौतुक होत आहे.
महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव
भारताच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यावर त्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. मात्र, दिव्यांग क्रिकेट संघात महाराष्ट्राची एकमेव प्रतिनिधी असलेल्या गंगा कदमच्या वाट्याला केवळ कौतुकाचे शब्दच आले.
इतर राज्यांनी दिली बक्षिसे
भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघातील इतर राज्यांतील खेळाडूंना त्यांच्या राज्य सरकारने आर्थिक बक्षिसे आणि नोकरीची आश्वासने दिली आहेत; परंतु महाराष्ट्र शासनाकडून किंवा अन्य कुणाकडूनही अद्याप कोणतेही आश्वासन मिळालेले नाही.
- गंगा कदम, उपकर्णधार, भारतीय क्रिकेट संघ