महालक्ष्मी सणानिमित्त बाजार फुलला
By Admin | Updated: September 2, 2014 23:54 IST2014-09-02T23:54:36+5:302014-09-02T23:54:36+5:30
महालक्ष्मी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारचा आठवडी बाजार आल्याने मोठी गर्दी झाली.

महालक्ष्मी सणानिमित्त बाजार फुलला
हिंगोली : मागील तीन दिवसांपासून संततधार लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्णत: उघडीप दिली. योगायोगाने महालक्ष्मी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारचा आठवडी बाजार आल्याने मोठी गर्दी झाली. सणासाठी आवश्यक पूजेपासून सजावटीपर्यंतच्या साहित्याची खरेदी झाली.
मोठ्या सणांपैैकी महालक्ष्मीचा एक सण. घरोघरी मंगळागौरीची स्थापना केली जाते. मंगळवारी रात्रीचाच मुहूर्त असल्याने सकाळीच नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते. केळीचे पाने, मक्याचे कणीस, काकडी, भेंडी, भोपळ, बीट, चवळीच्या शेंगा, गवार, वालच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. प्रत्येकाकडून खरेदी होणारच असल्याने विक्रेत्यांनी २ ते ४ रूपयांनी भावही वाढविले होते. नागवेलीचे पानांनाही मोठी मागणी होती. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हारांनी लक्ष वेधून घेतले होते. फळांमध्ये केळीच्या विक्रेत्यांनी अगदी रस्त्यावर गाडे उभा केले होते. १५ पासून ३० रूपयांपर्यंत डझनावर केळी विकली गेली. पूजेच्या साहित्यामध्ये सूपारी, नारळ, हळद, कुंकू आदींची खरेदी महिलांनी केली. वाण देण्यासाठी लहान साहित्याची खरेदीही झाली. पावसाळ्यात पहिल्यांदा एवढी गर्दी पाहवयास मिळाली. त्यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. (प्रतिनिधी)