Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:16 IST2020-08-14T20:15:37+5:302020-08-14T20:16:15+5:30
हिंगोली शहरातील दुकानचालक, भाजीपाला विक्रेते व पानटपरीचालकांना दंड

Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई
हिंगोली : ‘संचारबंदी नावालाच लपून-छपून दुकाने सुरूच’ या मथळ्याखाली लोकमत ने १२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करताच महसूल व न. प. प्रशासनाच्या वतीने आता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. पथकामार्फत शहरात १३ आॅगस्ट रोजी दुकाने सुरू ठेवणाऱ्या ११ जणांवर कारवाई करून एकूण ११ हजार ५०० रूपये दंड वसूल केला.
हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी ग्रामीण भागात आठवडी बाजार भरत आहेत. शिवाय हिंगोली शहरातही विविध ठिकाणी किराणा दुकान, शूजसेंटर, हॉटेल, झेरॉक्स मशिन, फळ व भाजीपाले विक्रेतेही लपून-छपून दुकाने सुरू ठेवित आहेत. या दुकानचालकांवर आता पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरूवारी पथकातर्फे कारवाई सुरू असल्याचे पाहून काही मास विक्रेत्यांनी दुकाने बंद करून धूम ठोकली. तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनाही दंड ठोठावण्यात आला अशी माहिती पथकप्रमुख डी. पी. शिंदे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग टाळता यावा म्हणून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ६ ते १९ आॅगस्ट या कालावधीत कडक संचारबंदीचे आदेश काढले आहेत़ परंतु संचारबंदी काळातही हिंगोली शहरात तसेच ग्रामीण भागातही नागरिकांची गर्दी होत असून लपून-छपून दुकाने सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे़ संचारबंदीतही वारंवार दुकाने सुरू ठेवली जात असल्यामुळे पथकातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ यापूर्वीही भाजी विक्रेते, किराणा दुकान चालक, पानटपरीधारक यासह इतर व्यवसायिकावरही टिम ने कारवाई केली होती़ परंतु वेळोवळी सूचना देवूनही नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
त्यामुळे आता प्रथम दंडात्मक कारवाई केली जात असून त्यानंतर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़ हिंगोली शहरात मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. १३ आॅगस्ट रोजी पथकातील तहसीलदार गजानन शिंदे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, टीम ११ चे पथक प्रमुख डी़पी़शिंदे, सहायक पंडीत मस्के, शिवाजी घुगे, गजानन आठवले, नितीन पहिणकर, संदीप घुगे, गजानन बांगर, कैलास थिट्टे आदींनी कारवाई केली.
... तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल
हिंगोली शहरातील दुकान चालकांनी लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे़ अन्यथा संबंधिताविरूध्द दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा ऩप़मुख्याधिकारी डॉ़ अजय कुरवाडे यांनी दिला. त्यामुळे संचारबंदी नियमांचे प्रत्येकांनी पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले.