मुक्तबंदी, परीविक्षाधीन अपराधींच्या अनुदानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:44+5:302021-02-06T04:54:44+5:30
हिंगोली : मुक्तबंदी व परीविक्षाधीन अपराधी यांना व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाने वाढ केली असून, हे अनुदान महिला व ...

मुक्तबंदी, परीविक्षाधीन अपराधींच्या अनुदानात वाढ
हिंगोली : मुक्तबंदी व परीविक्षाधीन अपराधी यांना व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाने वाढ केली असून, हे अनुदान महिला व बालविकास विभागाच्या वतीने गतवर्षी डिसेंबर महिन्यात देण्यात आले आहे.
मुक्तबंदी (जेलमधून सुटलेले अपराधी) परीविक्षाधीन (महिला व बाल विकास विभागाच्या देखरेखीखाली सोडलेेले अपराधी) अपराधींना यापूर्वी व्यवसायासाठी शासनाच्या वतीने ५ हजार रुपयांचे सहायक अनुदान दिले जायचे. परंतु, महागाईच्या मानाने हे अनुदान तोकडे पडत असल्याचे पाहून १४ ऑक्टोबर २०१६ पासून त्यात २५ हजाराने घसघसीत अशी वाढ केल्याचे शासनाने जाहीर केले आहे.
सराईत अपराधी व अपराधी परीविक्षा योजनेअंतर्गत मुक्तबंदी, परीविक्षाधीन अपराधी यांच्या पुनर्वसनार्थ सहायक अनुदान वस्तू स्वरुपात साहित्य खरेदी करून देण्यासाठी शासनाने अपराधींच्या अनुदानात २० हजार रुपयांनी वाढ केली असून, २५ हजार रुपये याप्रमाणे हे अनुदान देण्यात येत आहे.
मुक्तबंदी व परीविक्षाधीन अपराधी यांच्या पुनर्वसनासाठी सहायक अनुदान मंजुरीचे अधिकार जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना बहाल केले आहेत. त्यानुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा परीविक्षा अधिकारी यांच्या देखरेखीत असलेल्या ४ परीविक्षाधीन व २ मुक्तबंदी अपराधींना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे ६ लाभार्थ्यांसाठी १ लाख ५० हजार रुपयांचे सहायक अनुदान खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ते अनुदान डिसेंबर २०२०मध्ये ‘आरटीजीएस’द्वारे वाटपही करण्यात आले असल्याचे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील मुक्तबंदी बाबुराव ऊर्फ बबन पुंजाजी वाकळे (रा. सापटगाव, ता. सेनगाव) यांना गाय खरेदीसाठी २५ हजार रुपये, मुक्तबंदी पांडुरंग गणपती बोंगाणे (रा. उमरा, ता. औंढा नागनाथ) यांना शेळी पालनासाठी २५ हजार रुपये, परीविक्षाधीन विश्वनाथ किशनराव जाधव (रा. जुनुना, ता. वसमत) यांना बैल खरेदीसाठी २५ हजार रुपये, परीविक्षाधीन गोरख विठ्ठलराव काळे (रा. म्हैसगव्हाण, ता. कळमनुरी) यांना बैल खरेदीसाठी २५ हजार रुपये, परीविक्षाधीन बालाजी चपंतराव खराटे (रा. बोराळा, ता. वसमत) यांना शेळी पालनासाठी २५ हजार रुपये आणि परीविक्षाधीन साहेबराव बाभनाजी दळवी (रा. दाभाडी, ता. वसमत) यास म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले असून, त्याचे वाटपही डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्या खात्यावर ‘आरटीजीएस’ द्वारे केेले आहे.
प्रतिक्रिया
मुक्तबंदी व परीविक्षाधीन अपराधी यांच्या पुनर्वसनार्थ शासनाने सहायक अनुदानात वाढ केली आहे. अनुदान वाटप करण्याचा अधिकार महिला व बालविकास विभागास बहाल केला आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुदान डिसेंबर २०२०मध्ये वाटप केले आहे.
-विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली