जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:12 IST2021-05-20T15:11:26+5:302021-05-20T15:12:12+5:30
crime in Hingoli : ५ मेला शेतातील धुरा का काढला, या कारणावरून उज्वला रामेश्वर भवर ( ३८ ) यांना घरासमोर मारहाण करण्यात आली.

जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून
जवळा बाजार ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील हट्टा येथे शेताचा धुरा का काढला काढला, या कारणावरून १५ मे राेजी एका महिलेस भावकीतील काही जणांनी जबर मारहाण करून डाेके भिंतीवर जोरात आपटून गंभीर जखमी केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा नांदेड येथे उपचार सुरू असताना १८ मे च्या मध्यरात्रीला मृत्यू झाला. याप्रकरणी १९ मे रोजी हट्टा पाेलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर आप्पासाहेब भवर यांची हट्टा येथे शेती आहे. त्यांचा भावकीतील काही जणांसोबत जमिनीवरून वाद सुरु आहे. १५ मेला शेतातील धुरा का काढला, या कारणावरून भावकीतील काही जणांनी रामेश्वर यांची पत्नी उज्वला रामेश्वर भवर ( ३८ ) यांना घरासमोर मारहाण केली. यावेळी उज्वला यांचा हात पिळून त्यांचे डोके भिंतीवर जोरात आपटून गंभीर जखमी करण्यात आले. मारहाणीत गंभीर जखमी उज्वला यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १८ मे च्या मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फिर्याद रामेश्वर आप्पासाहेब भवर ( रा. हट्टा ता. वसमत ) यांनी हट्टा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून नैनेश अशोकराव भवर, उमेश शिवाजी भवर, संदीप शिवाजी भवर, राजू अशोक भवर, शिवाजी बालासाहेब भवर, अशोक बाळासाहेब पवार, मंगल शिवाजी भवर, अनुजा अशोक पवार या आठ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनी गजानन मोरे हे करीत आहेत.