Kalamnuri Parishad Election Result 2025: कळमनुरीचा 'कौल' शिंदेसेनेला! नगराध्यक्षपदी आश्लेषा चौधरी, १३ नगरसेवकांसह एकहाती सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:55 IST2025-12-21T15:53:44+5:302025-12-21T15:55:50+5:30
कळमनुरीकरांनी दिली शहराची चावी शिंदेंच्या सेनेकडे.

Kalamnuri Parishad Election Result 2025: कळमनुरीचा 'कौल' शिंदेसेनेला! नगराध्यक्षपदी आश्लेषा चौधरी, १३ नगरसेवकांसह एकहाती सत्ता
कळमनुरी (हिंगोली): कळमनुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक शिंदेसेनेने मोठे यश संपादन केले आहे. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आश्लेषा वैभव चौधरी यांनी १३८३ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे, केवळ नगराध्यक्षच नाही तर नगरसेवक पदाच्या १३ जागा जिंकत शिंदेसेनेने पालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
अशी राहिली मतांची आकडेवारी
नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आश्लेषा चौधरी यांनी ५६३५ मते मिळवून प्रथम स्थान पटकावले. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नुरुन्निसा बेगम यांना ४२५२ मते मिळाली, तर काँग्रेसच्या कौसर बेगम ३२८८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भाजपच्या वैशाली कावडे (१६८४) आणि उद्धव सेनेच्या सुवर्णा देशमुख (१२९८) यांना मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळाले.
सभागृहात शिवसेनेचा 'डंका'
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. कळमनुरीच्या एकूण जागांपैकी १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहात कुबड्यांची गरज उरलेली नाही. राष्ट्रवादीला ४, भाजपला २ आणि काँग्रेसला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. वंचित, एमआयएम आणि बसपा या पक्षांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले.
विकासाच्या नव्या अपेक्षा
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला. "हा विजय माझा नसून कळमनुरीतील प्रत्येक नागरिकाचा आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया आश्लेषा चौधरी यांनी विजयानंतर व्यक्त केली. आता कळमनुरी शहराच्या विकासाची गाडी कोणत्या वेगाने धावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.