वर्षभरातील डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST2021-05-16T04:28:59+5:302021-05-16T04:28:59+5:30
हिंगोली : पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलचे दर वाढल्याने किराणा वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. वर्षभरात ...

वर्षभरातील डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या
हिंगोली : पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलचे दर वाढल्याने किराणा वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असून गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मजूर, कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने मदत केली असली तरी अजून हाती पडली नाही. एकीकडे सर्वसामान्य त्रस्त असताना पेट्रोल, डिझेल दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने मालाच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. परिणामी किराणा साहित्याचे दरही वाढत आहेत. मागील वर्षभरापासून किराणा वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून २०२० मध्ये डिझेलचे दर प्रति लिटर ७२.२३ विक्री होत होते. ते आता ८८ रुपये ७५ पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे किराणा वस्तूंचे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान, सध्या कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फायदा किराणा व्यापारी उठवित आहेत. एकच किराणा वस्तू व्यापारी वेगवेगळ्या किमतीत विकत आहेत. चढ्या दराने विक्री होत असल्याचा आरोपही ग्राहक करीत आहेत.
काय म्हणतात गृहिणी...
गॅस सिलिंडरचे दरही वाढले असून खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात किराणा मालाचे इतर वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांनी कसे जगावे?
-मानसी राहुल नरवाडे, हिंगोली
कोरोना काळात सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यात गॅस सिलिंडरचे दरही महागले आहेत. आता किराणा वस्तूंही महागल्याने घर कसे चालवावे? शासनाने वाढती महागाई कमी करावी.
- सुजाता रवी बगाटे, हिंगोली
डिझेल दर वाढीमुळे वाहनमालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे किरणा वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत.
-बाळू घुगे, किराणा व्यापारी
किराणा दर मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूरडाळ ८४ ९० १०८
हरभरा डाळ ५१ ६० ६५
साखर ३४ ३४ ३५
तांदूळ (कोलम) ४४ ४५ ४८
गूळ ३३ ३५ ३७
बेसन ५५ ६५ ८०
तेलही दुप्पट महाग (दर प्रति किलो)
प्रकार मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
सूर्यफूल १२० १६५ १७०
करडई १८० १९५ १७०
सोयाबीन १०५ ११५ १५५
पामतेल १०० ११० १४०
शेंगदाणा १४५ १७० १८०
डिझेल दराचा भाव प्रति लिटर
जानेवारी २०२० - ७०.२१
जून २०२० - ७२.२३
जानेवारी २०२१ - ८१.३७
मे २०२१ -८८.७५