गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून आजपर्यत हिंगोली आगाराची एकही प्रवासी बस बाहेर सोडण्यात आली नाही. तसेच पर जिल्ह्यातीलही बसेस आगारात आलेल्या नाहीत. आजमितीस सर्व प्रवासी बसेस आगारात उभ्या केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार २५ कर्मचारी सद्य:स्थितीत कामावर आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जाईल त्यांनीच कामावर यावे. इतरांनी मात्र बाहेर न पडता घरीच बसावे, असेही एस. टी. महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आगारातील बसेस दुरुस्तीसाठी चार ते पाच यंत्रकारागिरांनाच बोलाविण्यात येत आहे.
२६ एप्रिल रोजी हिंगोली ते परभणी मालवाहू बस सोडण्यात आली. या बसला भाड्यापोटी ३७५० उत्पन्न मिळाले. या बसमध्ये सरकीची वाहतूक करण्यात आली. २९ एप्रिल रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४२५०), ३० एप्रिल रोजी हिंगोली ते अर्धापूर (हळद वाहतूक, भाडे ४१५०), १ मे रोजी हिंगोली ते बीड (अंगणवाडीचा खाऊ, भाडे ८३९०), २ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ३ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते अकोला (हरभरा वाहतूक, भाडे ५५००), ५ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ६ मे रोजी हिंगोली ते परभणी (सरकी ढेप, भाडे ३७५०), हिंगोली ते अकोला (हळद वाहतूक, भाडे ५५००) असे एकूण ५१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न महामंडळास मिळाले.
मास्क घालूनच कामावर यावेजिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे पाहून सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. आजमितीस सुचनेनुसार कर्मचारीही कमी संख्येने कर्तव्यावर आहेत. विशेष म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या चालकालाही मास्क घालण्याची सूचनाही केली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. प्रशासनाने आदेश दिला तरच प्रवासी बसेस सुरु होतील. आजतरी मालवाहतूक बसेस तेवढ्या सुरु आहेत.
-प्रल्हादराव बरडे, वाहतूक निरीक्षक, हिंगोली आगार