हिंगोली 'ZP'मध्ये घुमले 'बे एके बे'चे पाढे; हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा

By विजय पाटील | Published: January 29, 2024 03:40 PM2024-01-29T15:40:27+5:302024-01-29T15:43:51+5:30

या शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी मागील एक वर्षापासून मागणी केली जात होती.

in Hingoli Zilla Parishad; A school full of students of Hiwarkheda | हिंगोली 'ZP'मध्ये घुमले 'बे एके बे'चे पाढे; हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा

हिंगोली 'ZP'मध्ये घुमले 'बे एके बे'चे पाढे; हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जि.प. शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग असताना शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांनी जि.प.तच शाळा भरविली. 

हिवरखेडा येथील जि.प. शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. पटसंख्या १०६ आहे. मात्र, या ठिकाणी शिक्षकांची संख्या त्या तुलनेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. या शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी मागील एक वर्षापासून मागणी केली जात होती. मात्र जि.प. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या ठिकणी आधी चार शिक्षक होते. आता तर ही संख्या दोनवर आली आहे. शेवटी पालकांनी मुलांसह जिल्हा परिषद गाठून या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. जि.प.तच मुलांनी शाळा भरविल्याने प्रशासनाची धांदल उडाली. या शाळेत शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. या शाळेला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष क्षीरसागर यांनी सांगितले की, आमच्या गावातील शाळेत १०६ विद्यार्थी असताना दोनच शिक्षक आहेत. अनेक वर्ग रिकामे राहतात. त्यांचे तास बुडतात. मुलांना कोणी शिकवलेच नाही, तर त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार नाही तर काय? मात्र प्रशासन ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्कच वेगळ्या पद्धतीने हिरावून घेत आहे.

जिल्हा परिषदेत घुमले बे एके बेचे पाढे
सावरखेडा येथील विद्यार्थ्यांनी जि.प.त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडल्यानंतर या ठिकाणी बे एके बे चा पाढा दहापर्यंत म्हणून घेतला. त्यामुळे या मुलांच्या किलबिलाटाचा आवाज जि.प.त घुमत असल्याचे पहायला मिळाले.

Web Title: in Hingoli Zilla Parishad; A school full of students of Hiwarkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.