हिंगोली : मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता चर्चेला संधी नसून, २९ ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षणच घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणत असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी हिंगोलीत आले होते. त्यांनी १६ ऑगस्ट रोजी माध्यमाशी संवाद साधला.
मग, आणखी चर्चा कशासाठी? जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे म्हणाले, 'ओबीसी समाज बांधवांनाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. परंतु, काही राजकीय नेतेमंडळी ओबीसीच्या जीवावर राजकरण करू पाहत आहेत. मराठा कुणबीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या असून, त्याचा अहवाल सरकारकडे आहे. मग, आणखी चर्चा कशासाठी?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, तर दोन वर्षांपासून सातत्याने आंदोलन सुरू आहेत. परंतु, अजूनही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे', अशी खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केली.
जरांगे म्हणाले, 'सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'
'मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे आणि अतिशय शांततेत जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे', अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
'२७ ऑगस्टला अंतरवालीतून निघणार असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहोत. जर मराठा समाजबांधवास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळेस आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
'सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण तर ओबीसीमधूनच घेणार असून, त्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. संयम ढळला तर हा समाज कुणालाच ऐकणारा नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे आणि समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. आम्ही न्याय मागतो अन् सरकारने जाणिवपूर्वक अन्याय चालविला आहे. परंतु, आता टोलवाटोलवी सरकारला महागात पडेल', असे जरांगे पाटील म्हणाले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका केली.
समाजाला साथ द्या; अन्यथा बाजार उठवू...
'मराठा समाजाच्या जीवावर नेतेमंडळी निवडून आले, मोठे झाले आहेत. गोरगरीब मराठा समाजबांधवांच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी या नेते मंडळींनी खंबीरपणे साथ देणे अपेक्षीत आहे. परंतु, जर तुम्हीच जर समाजाला साथ देत नसाल तर समाजानेही तुमच्या पाठीशी काय म्हणून उभे रहायचे. अजूनही वेळ गेलेली नसून, नेतेमंडळींनी मराठा समाजाला साथ द्यावी. अन्यथा हा समाज नेतेमंडळींचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.