मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे
By विजय पाटील | Updated: December 7, 2023 18:47 IST2023-12-07T18:44:52+5:302023-12-07T18:47:51+5:30
जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल.

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे
हिंगोली : मराठा आरक्षणाच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच हलणार नाही. तुम्हीही एकजूट कायम ठेवा. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून कायदा पारित न केल्यास सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथील सभेत दिला.
जरांगे म्हणाले, मराठ्यांना ओबीसींसोबत लढवण्याचा डाव आहे. मात्र त्यांच्यासोबतचे संबंध चांगले ठेवा. गाव पातळीवर ओबीसी व मराठा एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे आहेत. मात्र कुणी राजकीय फायद्यासाठी त्यांच्याशी संबंध बिघडवू पाहात असेल तर त्याला बळी पडू नका.
आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नयेत. आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे आवाहनही जरांगे यांनी केले. तर सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. ३०७, १२० ब, ३५३ सारखे गुन्हे दाखल केले. एकट्या छगन भुजबळांच ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर सरकारला जड जाईल. ३५ लाख मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या. जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल.
जरांगे पुढे म्हणाले, आमच्या लेकराबाळांच भविष्य या आरक्षणात अडकले आहे. माझा जीव गेला तरीही मी भीत नाही. हीच एक संधी आहे. राजकीय जोडे बाजूला काढा. पुढाऱ्यांना जातीपेक्षा मोठे मानू नका, एकजूट कायम ठेवा. शांततेने हा लढा जिंकू. जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
भुजबळांवर टीका
छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी या सभेत जोरदार टीका केली. घटनेच्या सभागृहात बसतो अन् कायदा पायदळी तुडवतो. आता मराठ्यांच्या नादी लागलात तर अवघड आहे, असा इशारा दिला. काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याची भाषा केली जाते. हे तर आमच्या रक्तातच आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? असा सवाल केला. राजकीय व जातीय दंगली करण्याचे भुजबळांचे स्वप्न आहे. ते पूर्ण होवू देवू नका, असे आवाहन केले.