सेनगाव (जि. हिंगोली) : पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाजवळील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलावरून पिकअप नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ३१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सा.बां. विभागाच्या दिरंगाईचा आणखी एक बळी गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अंकुश शिंदे हे मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास पिकअपने जालना येथून गावाकडे निघाले होते. येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळले. सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा प्रवाह आहे. पिकअप पाण्यात पडल्यानंतर पुलाला अडकली, मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही. ही घटना रात्री घडल्याने कोणाच्याही लक्षात आली नाही. बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्यांना वाहन दिसल्यानंतर हा अपघात उघडकीस आला.
दरम्यान, मागील वर्षी येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने येथे वारंवार छोटे- मोठे अपघात होत आहेत.
नवा पूल ठरतोय पांढरा हत्ती !विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक सीलिंग पद्धतीचा पूल बांधला आहे. मात्र, केवळ पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते पूर्ण झाले नसल्याने हा पूल मागील वर्षभरापासून वापराविना पडून आहे. नवीन पूल तयार असतानाही वाहनधारकांना जीव धोक्यात घालून जुन्या अरुंद पुलावरून कसरत करावी लागत आहे.
चार तास वाहतूक कोंडी...बुधवारी येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी असते. पुलाच्या मध्यभागी ही घटना घडल्याने आणि बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढला.
नागरिकांचा सवाल...नवा पूल तयार असूनही रस्ते का पूर्ण केले जात नाहीत? आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल? असा संतप्त सवाल शिंदे टाकळी आणि येलदरी परिसरातील ग्रामस्थांनी विचारला आहे.
Web Summary : A pickup fell from Yeldari dam's narrow bridge due to missing barriers, killing a 31-year-old. Locals are angry at the delayed road construction for the new bridge, forcing dangerous crossings. The incident caused traffic jams.
Web Summary : येल्डरी बांध के संकरे पुल से बिना रेलिंग के एक पिकअप गिरने से 31 वर्षीय युवक की मौत हो गई। स्थानीय लोग नए पुल के सड़क निर्माण में देरी से नाराज हैं, जिससे खतरनाक क्रॉसिंग हो रही है। घटना से यातायात जाम हो गया।