Hingoli: वारंवार भूकंपाच्या धक्क्याने वसमत तालुका हादरला; कुपटीसह अनेक गावांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:40 IST2025-12-05T16:39:17+5:302025-12-05T16:40:02+5:30
या अनपेक्षित घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

Hingoli: वारंवार भूकंपाच्या धक्क्याने वसमत तालुका हादरला; कुपटीसह अनेक गावांमध्ये भीती
वसमत : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला भूकंपाचे वारंवार बसत असलेले धक्के चिंता वाढवणारे ठरले आहेत. ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी वसमत तालुक्यातील कुपटी येथे भूगर्भातून मोठा आवाज येत जमिनीला मोठा धक्का बसला. या अनपेक्षित घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती.
सकाळच्या वेळी भूगर्भातून अचानक मोठा आवाज आला आणि जमीन हादरली, ज्यामुळे नागरिकांना काही क्षण काय झाले हे कळालेच नाही. त्यानंतर भूकंपाचा धक्का असल्याचे स्पष्ट होताच गावातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले. कुपटी येथील या धक्क्यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी पांगरा शिंदे आणि परिसराला भूकंपाचे सलग तीन धक्के बसले होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते.
आज बसलेला धक्का केवळ कुपटीपुरता मर्यादित नव्हता, तर पांगरा शिंदे, वापटी, शिरळी यासह आजूबाजूच्या गावांनाही भूकंपाचा हा हादरा जाणवला. मागील काही वर्षांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाकडून भूगर्भातील सूक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे स्पष्टीकरण दिले जात असले तरी, वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे वसमत तालुक्यातील नागरिकांमध्ये आता मोठी भीती व्यक्त केली जात आहे.